पर्यावरण मंत्री रामदास कदम व महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मिठी दौऱ्यावरून पालिकेत पुन्हा एकदा राजकारण रंगले असून भाजपचे गटनेता मनोज कोटक यांनी पत्रातून महापौरांना कानपिचक्या दिल्या आहेत.
मिठी नदीचा दौरा केवळ संघटनेच्या स्तरावर मर्यादित न ठेवता पालिकेतील इतर पक्षातील नेत्यांना कळविले असते तर त्यांच्या सूचना व सहकार्य मिळाले असते असे नमूद करत मिठी नदीबाबत पालिकेने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती देण्याची मागणी कोटक यांनी पत्रातून केली आहे. मिठी नदीत येणारे सांडपाणी वळवण्याची व्यवस्था अजूनही झालेली नाही, अनधिकृत बांधकामे कायम आहेत, प्रदूषण करणाऱ्या तेल, रसायनांच्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, एमएमआरडीएकडून घेतलेला भाग तसेच पालिकेच्या हद्दीत असलेल्या भागातही गाळ काढण्याचे, नदी रुंद करण्याचे व सुशोभिकरणाचे काम मंद गतीने होत आहे असे कोटक यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १२६० कोटी रुपयांच्या निधीची सद्यस्थिती काय आहे, पालिकेने मिठीसाठी किती खर्च केला याची माहितीही त्यांनी मागितली आहे. एकीकडे शिवसेनेशी युती करून पालिकेत व राज्यात सत्ता काबिज करणाऱ्या भाजपाकडून सेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली जात नाही. मिठीचा दौरा हा त्यातील ताजा घटनाक्रम आहे.

Story img Loader