आपल्या मर्जीतील प्राध्यापिकेसाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे प्रयत्न
मुंबई विद्यापीठातील ‘भारतीय रिझर्व बँक’चलित (आरबीआय) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकीय अर्थकारण’ या प्रतिष्ठीत अध्यासनपदाच्या निवड प्रक्रियेत उघडपणे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे आढळून आली आहे. सुमारे चार कोटीचा निधी, भरघोस पगार आणि परदेश वाऱ्या अशी ‘मलई’ असलेल्या या अध्यासनावर आपल्या मर्जीतील प्राध्यापिकेची वर्णी लागावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने जोरदार प्रयत्न चालवल्याचे समजते.
संशोधनाला चालना मिळावी यासाठी आरबीआयने या अध्यासनाला सुमारे चार कोटींचा निधी दिला आहे. या पैशातून येणाऱ्या व्याजावर अध्यासनाचा खर्च चालतो. प्राध्यापकाच्या दर्जाचे वेतन, वर्षांतून एकदा परदेशवारी आदी आर्थिक स्वरूपाच्या फायद्यांबरोबरच या अध्यासनाला मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे हे अध्यासन आपल्या मर्जीतील प्राध्यापिकेला मिळावे म्हणून राष्ट्रवादीच्या या नेत्याने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी अध्यासन निवडप्रक्रियेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात येत आहेत.
अध्यासनपदासाठी प्रा. माला लालवाणी, प्रा. स्वाती राजू, प्रा. के. एस, इंगोले, प्रा. मृणालिनी फडणवीस, सनी डॉली यांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी प्रा. राजू आणि प्रा. इंगोले यांनी माघार घेतली. त्यामुळे आता प्रा. लालवाणी, प्रा. डॉली आणि प्रा. फडणवीस यांच्यात चुरस आहे. अध्यासनाच्या निवड समितीवर कुलगुरू राजन वेळुकर यांच्यासह अर्थशास्त्र विभागाचे संचालक एल. जी. भुरंगे यांचा समावेश होता. याशिवाय विषयतज्ज्ञ म्हणून तिघाजणांचा समितीत समावेश केला जातो. पण, १४ डिसेंबरला मुलाखतीच्या दिवशी नागपूरचे विनायक देशपांडे आणि शिवाजी विद्यापीठाचे आर. जी. दांडगे हे दोघेच विषयतज्ज्ञ म्हणून उपस्थित होते. तिघेही विषयतज्ज्ञ कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाशी संबंधित नसावे, असा नियम आहे. दांडगे हे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळावर असल्याने तयांची नियुक्ती गैर आहे. याच कारणावरून राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड समिती बरखास्त करून नव्याने निवड समिती नेमली होती. पण, खुद्द कुलगुरू वेळुकरांनीच या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. हे सर्व संबंधित प्राध्यापिकेची वर्णी लागावी, यासाठीच सुरू असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, विद्यापीठातील काही शिक्षक हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या मदतीने चव्हाटय़ावर आणण्याच्या प्रयत्नात असल्याची कुणकुण लागताच अध्यासनासाठी २४ जानेवारीला झालेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यात दांडगे यांची निवड समितीवरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या मुलाखतीदरम्यान दांडगे गैरहजर राहिले. त्याऐवजी देशपांडे यांच्यासह दिल्लीच्या जेएनयूचे प्रा.प्रभात पटनाईक आणि पुण्याच्या प्रा. धनमंजिरी साठे या विषयतज्ज्ञ म्हणून उपस्थित होत्या. यापैकी पटनाईक वगळता देशपांडे आणि साठे यांचा विद्यापीठाच्या शैक्षणिक प्राधिकरणांवर समावेश असल्याची चर्चा आहे. पण, गंमत म्हणजे मुलाखतीचा पहिला टप्पा वेगळ्याच सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेला असताना दुसऱ्या टप्प्यात भलतेच विषयतज्ज्ञ आणून उमेदवारांची निवड करायची, हा प्रकारच चक्रावून टाकणारा आहे. या बाबत विद्यापीठाच्या अध्यापक नियुक्ती विभागाचे संचालक दिनेश कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता सबंधित बाब गोपनीय असल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कशी मी राखू मर्जी..
फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या या नेत्याने काही वर्षांपूर्वी संबंधित महिलेची विद्यापीठात वर्णी लागण्यासाठीही आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. राजकारण्यांशी मैत्री साधण्याची चांगली कला अवगत असलेल्या या महिलेची विद्वत्तेच्या नावाने मात्र बोंब आहे. त्यामुळे, प्राध्यापिका म्हणूनही त्या फारशी चमक दाखवू शकलेल्या नाहीत. गैरमार्गाने मार्गदर्शक म्हणून आपल्या नावापुढील पीएचडी वाढविण्याचे बरेच प्रकार या महिलेच्या नावावर जमा आहेत. बायोडेटा फुगविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आता या प्राध्यापिकेची नजर रिझव्र्ह बँकेच्या या प्रतिष्ठित अध्यासनावर आहे.