लोकसभा निवडणुकीची हवा तापू लागल्यानंतर अनेक छोटय़ा गोष्टींचा उपयोगही ‘राजकारणा’साठी होऊ लागला असून शुक्रवारी एका रेल्वे अपघाताचेही राजकारण केले गेले. मुलुंड स्थानकात एका तरुणाचा अपघात झाला आणि त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली अथवा नाही, यावरून हे प्रकरण ‘मनसे’च्या एका आमदारापर्यंत पोहोचले. आमदाराने आपल्या समर्थकांसह रेल्वे स्थानक गाठत रेल्वे कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. हा प्रकार तब्बल दीड तास चालला. मात्र जमावाचा पारा चढल्याचे लक्षात आल्यानंतर मुलुंड स्थानकावरील केबिन कंट्रोलरने स्थानकात शिरणारी शेवटची कर्जत लोकल मुलुंड स्थानकाआधीच काही काळ थांबवून ठेवली. पण शनिवारी सकाळी मात्र रेल्वे प्रशासनाने या कर्मचाऱ्यालाच धारेवर धरले. या सर्वच प्रकरणामुळे मुलुंड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राजकारणी आणि रेल्वे प्रशासन या दोहोंकडून थपडा खाव्या लागल्या, तर आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसू, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने स्पष्ट केले.
शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास विक्रोळी येथे राहणाऱ्या निखिल शेटे या तरुणाचा मुलुंड स्थानकात अपघात झाला. ही घटना उपस्थानक व्यवस्थापक एस. के. सिंग यांना कळताच त्यांनी तातडीने या तरुणाला रुग्णवाहिकेच्या आधारे जवळच्याच सावरकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या तरुणाला अपघात झाल्यानंतर २० मिनिटांमध्ये रुग्णालयात पोहोचवल्याचा दावा मुलुंड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला. तेथील सोपस्कार पार पडल्यानंतर सिंग पुन्हा कामावर रूजू झाले. मात्र रात्री सव्वाअकराच्या सुमारास विक्रोळीचे स्थानिक आमदार मंगेश सांगळे यांनी आपल्या समर्थकांसह मुलुंड स्थानकात प्रवेश केला. अपघाती तरुणाच्या मदतीसाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी साधा स्ट्रेचरही दिलेला नाही, रुग्णवाहिकेसाठीही दूरध्वनी केला नाही, असे सांगत या परप्रांतीय रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजेत, अशी दटावणी केली. लोहमार्ग पोलिसांनी या अधिकाऱ्याला त्वरीत अटक करावी, अशी मागणी करत त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड स्थानकात ठिय्या मांडला.
रात्री एकच्या सुमारास जमाव अधिकच आक्रमक झाल्याचे पाहून मुलुंडमध्ये केबिन कंट्रोलर म्हणून काम पाहणाऱ्या अशोक देवकाते यांनी शेवटच्या कर्जत लोकलला मुलुंड स्थानकाआधीच्या सिग्नलवर थांबवले. हा सर्व प्रकार साधारणपणे पाऊण तास सुरू होता. त्यामुळे ही गाडी तब्बल ४० मिनिटे सिग्नललाच थांबली होती. गाडी स्थानकात येऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल प्रशासनाकडून कौतुकाची थाप मिळण्याऐवजी देवकाते यांना दट्टय़ाच मिळाला.
याबाबत मंगेश सांगळे यांना विचारले असता, संबंधित रेल्वे अधिकाऱ्याने अतिशय असंवेदनशीलपणा दाखवल्याचे त्यांनी सांगितले. सिंग याने निखिलबरोबर असलेल्या त्याच्या मित्रांना स्ट्रेचर देण्यासही नकार दिला. रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे त्यांना अटक करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत काही रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता सांगळे एका अपघाताचे राजकारण करत असून घाटकोपर प्रकरणापासून असा हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांतर्फे केलाच जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
एका अपघाताचे राजकारण!
लोकसभा निवडणुकीची हवा तापू लागल्यानंतर अनेक छोटय़ा गोष्टींचा उपयोगही ‘राजकारणा’साठी होऊ लागला असून शुक्रवारी एका रेल्वे अपघाताचेही राजकारण केले गेले.
First published on: 09-03-2014 at 06:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics of an accident