एखादी व्यक्ती सुमार क्षमतेची असेल अथवा निर्णयच घेत नसेल तर त्याला बांगडय़ांचा आहेर देण्याची प्रथा पूर्वावार महिला आंदोलकांनी जपली आहे. मात्र मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्कारानंतर गृहमंत्र्यांना बांगडय़ा पाठविण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी करताच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणि काही महिला संघटनांनी घेतलेल्या पवित्र्यामागील राजकारणामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महिलांवरील अत्याचारात दिवसेदिवस वाढ होत असून ती रोखण्यात गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील हे संपूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. मुंबई हे कालपर्यंत सुरक्षित शहर समजले जात होते परंतु आता दिवसाढळ्या बलात्कारासारख्या घटना घडताना दिसतात. दिल्ली येथे चालत्या बसमध्ये ज्यावेळी एका तरुणीवर निर्घृणपणे बलात्कार झाला त्यावेळीही लाखो लोकांनी संताप व्यक्त केला होता. आताही मुंबईत एका महिला छायाचित्रकारावर मध्यवस्तीत सामूहिक बलात्कार झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत असताना राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त करून गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत त्यांना बांगडय़ा पाठविण्याचे आवाहन महिलांनाच केले, महिलांचा उपमर्द अथवा त्यांना कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही, असे मनसेचे आमदार व विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
यापूर्वीही महापालिकेत बांगडय़ांचे आहेर देण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक आंदोलनात महिलांनीच बांगडय़ांचे आहेर राज्यकर्त्यांना दिले आहेत. अगदी अलीकडे पालिकेत काँग्रेसच्या महिला नगरसेविकेने महापौरांना बांगडय़ांचा आहेर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही महिला संघटनांनी व राष्ट्रवादीने याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केल्याने बलात्कार पीडितांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा मूळ उद्देश बाजूला राहू शकतो अशी भीती नांदगावकर यांनी व्यक्त केली. ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत सापडते त्या प्रत्येक वेळी मूळ मुद्दय़ाला बगल देण्याचा उद्योग त्यांनी केल्याची टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. गृहमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांना सुरक्षा देण्यात हे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांना बांगडय़ांचा आहेर नाही तर काय फुलांचा बुके द्यावा का असा संतप्त सवालही दरेकर यांनी केला.
बांगडय़ांच्या आवाहनाचे ‘राजकारण’
एखादी व्यक्ती सुमार क्षमतेची असेल अथवा निर्णयच घेत नसेल तर त्याला बांगडय़ांचा आहेर देण्याची प्रथा पूर्वावार महिला आंदोलकांनी जपली आहे.
First published on: 25-08-2013 at 01:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics of bangals appeal