शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कसेही करून शिवसेना नेतृत्त्वाच्या नजरेत येण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचे वेगवेगळे प्रस्ताव मांडण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. त्यातून कोणाला राजकीय गणित साधायचे आहे, तर कोणाला हिशेब चुकते करायचे आहेत. यातून कसलेही प्रस्ताव पुढे येऊ लागल्यामुळे महापौर व सभागृह नेत्यांच्या संमतीशिवाय यापुढे बाळासाहेबांविषयी कोणतेही प्रस्ताव नगरसेवकांनी मांडू नयेत, असे आदेश सेनानेत्यांकडून देण्यात आले आहेत.
शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सर्वप्रथम शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्काराच्या जागी स्मारक उभारण्याची घोषणा करून एकाचवेळी श्रेय घेण्याचे आणि हिशेब चुकता करण्याचे राजकारण केल्याचे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांचा शिवाजी पार्कवरील स्मारकाला असलेला विरोध लक्षात घेतल्यास आगामी काळात विभागप्रमुख सदा सरवणकर यांना विधानसभेचे तिकीट दिले; तरी त्यांना जिंकणे अवघड ठरावे अशी व्यवस्था मनोहर जोशी यांच्या घोषणेमुळे झाल्याचे सेनेतच चर्चा आहे.
जोशी यांच्या पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनी जोशी यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. कायद्याच्या कसोटीवर हे टिकणार नाही, याची दोन्ही नेत्यांना कल्पना असतानाही त्यांनी वातावरण तापवून सेनेलाच अडचणीत आणाले. त्यापाठोपाठ पालिकेतील नगरसेवकांनी शालेय अभ्यासक्रमात बाळासाहेबांवरील धडा घ्या, शिवाजी पार्कचे शिवतीर्थ नामकरण करा, मुंबई महापालिकेच्या नियोजित विद्यापीठाला बाळासाहेबांचे नाव द्या, अशा सूचना व ठराव आणण्यास सुरुवात केली. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आणलेला शिवाजी पार्कचे नाव बदलण्याचा ठराव हा शिवसेनेला मोठा झटका होता. त्यामुळे यापुढे सभागृहनेते अथवा महापौरांना विचारल्याशिवाय कोणतेही प्रस्ताव आणू नका अशी समज देण्याची वेळ सेना नेतृत्वावर आली.

Story img Loader