लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच मराठवाडय़ात पुन्हा एकदा नामांतराच्या प्रश्नावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाला हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच प्रस्तावाला स्थानिक पातळीवरून विरोध होऊ लागला आहे. या प्रस्तावाला शिवसेनेचाही विरोध असल्याचे समजते. सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी मात्र पक्षात या विषयावर अजून कसलीही चर्चा झाली नाही, असे सांगितले.
१९७८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळात संमत झाला आणि त्या भागात दंगलीने पेट घेतला. या प्रश्नावरून महाराष्ट्राचे सारे राजकारण व समाजकारण ढवळून निघाले होते. नामांतरासाठी प्रदीर्घ काळ आंदोलने झाली. विद्यापीठाच्या नावात मराठवाडा शब्द कायम ठेवून नामविस्तार होऊन तब्बल १६ वर्षांनतर या वादावर पडदा पडला.
आता पुन्हा मराठवाडय़ातीलच कृषी विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव पुढे आला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे. त्या निमित्त कृषी विद्यापीठाला नाईक यांचे नाव देण्याचा मुख्यमंत्र्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात गुरुवारी सह्य़ाद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र या प्रस्तावाला मराठवाडय़ातूनच विरोध होत आहे.
वसंतराव नाईक विदर्भातील असल्याने मराठवाडय़ातील कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यास काही स्थानिक संघटनांनी विरोध केला आहे. मराठवाडा मुक्तीसाठी मोठा लढा झाला आहे. मराठवाडा ही एक अस्मिता आहे. त्यामुळे विद्यापीठाला नाईक यांचे नाव देण्यास नामांतरविरोधी संघर्ष समिती, मराठवाडा विभागीय बेरोजगार अभियंते संघटना, संभाजी सेना, जागरूक नागरिक समिती इत्यादी संघटनांचा विरोध असल्याचे कळते. नामांतराला शिवसेनेचाही विरोध असल्याचे समजते. या संदर्भात दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता, नामांतराचा निर्णय घेणे हा सरकारचा अधिकार आहे. आमच्या पक्षात त्याबाबत अद्याप काही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचा नामांतराला विरोध आहे काय, असे विचारले असता हा विषय वेगळा आहे, असे सांगून त्यावर स्पष्ट मत देण्याचे त्यांनी टाळले. एकंदरीत निवडणुकांच्या तोंडावर मराठवाडय़ात नामांतरावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा