सूक्ष्म प्रदूषित कण, धूळ शोषणारी यंत्रे ३३ ठिकाणी बसवणार
मुंबई शहरातील हवेचे प्रदूषण हटविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेली ‘वायू’ (६८४-विंग ऑग्युमेंटेशन अॅण्ड प्युरिफाईंग युनिट) यशस्वीरित्या कार्य करत असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आला आहे. सायन, घाटकोपर, कलानगर, भांडु प या चार ठिकाणांवरील वाहतूक बेटांवर ही यंत्रे बसविण्यात आली होती. या ठिकाणी हवेत असलेले अत्यंत सूक्ष्म प्रदूषित कण या यंत्रांनी ओढून घेतले आहेत. नेमके कोणते घातक रासायनिक घटक या कणांमध्ये आहेत याचा अहवाल आल्यानंतर मुंबईतील ३३ ठिकाणी ही यंत्रे बसविली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वायूप्रदूषणावर उतारा म्हणून ‘वायू’ यंत्रे प्रायोगिक पातळीवर शहरात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे वायू यंत्र आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनविले असून त्यांनी वर्षभरापूर्वी संस्थेच्या प्रवेशद्वारावर हे यंत्र बसवून तेथील प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण मिळते का, याचा अभ्यास केला होता. त्यात ६० टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर ‘निरी’ संस्थेने यात काही बदल करत आयआयटी मुंबई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण संस्थेच्या मदतीने डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात घाटकोपर, भांडुप, कलानगर, सायन येथील महत्त्वाच्या चौकांमध्ये ही यंत्रे बसविली होती.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत या यंत्रांनी नेमके काय कार्य केले, याचा अहवाल ‘निरी’ संस्थेतर्फे नुकताच प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही यंत्रे हवेच्या प्रदूषणावर परिणामकारक सिद्ध झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, याबाबत ‘निरी’ संस्थेचे संचालक राकेश कुमार यांना विचारले असता, त्यांनी ही यंत्रे परिणामकारकरित्या काम करत असून त्याबाबतचा अहवाल महाराष्ट्र नियंत्रण मंडळाला सादर केला असल्याचे सांगितले.
‘एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हे कण जमा झाल्याने ही यंत्रे योग्यरित्या काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. या रासायनिक घटकांचा अहवाल आणि आताचा अहवाल आम्ही वरिष्ठांपुढे मांडणार असून त्यानंतर मुंबईतील जास्त प्रदूषण होणाऱ्या ३३ ठिकाणी अशी यंत्रे बसविण्याचा विचार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक मोटागरे यांनी दिली.
काय म्हणतो अहवाल?
- वायू यंत्रे ही प्रदूषित हवा शोषून घेतात व शुद्ध हवा यंत्राबाहेर टाकतात. यंत्रात दूषित कण ओढण्यासाठी ‘थर्मल ऑक्सीडायझर’ बसविण्यात आले आहेत.
- गेल्या दोन महिन्यांपासून सायन, कलानगर, भांडुप, घाटकोपर या चार ठिकाणांवर ही यंत्रे सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत सुरू ठेवण्यात आली होती.
- ३० चौरस मीटर परिसरावर प्रभाव टाकणाऱ्या या यंत्रांमधील फिल्टरमध्ये हवेतील सूक्ष्म प्रदूषित कण शोषण्यात येतात. दर दोन-तीन दिवसांनी हे फिल्टर स्वच्छ करण्यात येतात.
- घाटकोपर येथे दोन महिन्यांनंतर ३८ हजार मिली ग्रॅम, सायन येथे २० हजार मिली ग्रॅम, कलानगर येथे १९ हजार मिली ग्रॅम आणि भांडूप येथे १६ हजार मिलीग्रॅम एवढे दूषित कण जमा झाल्याची नोंद आहे.