देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असताना देशाची आर्थिक राजधानीही प्रदूषणाविरोधात लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील विविध शहरांत प्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. परिणामी राज्यात आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाकरता राज्य सरकारकडून उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आज बैठक झाली. या बैठीकत राज्यातील वायू प्रदूषणाचा आढावा घेतला. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त आय. एस. चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावे. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरिता एक हजार टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा असे निर्देशही महापालिका आयुक्तांना दिले.
हेही वाचा >> दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आता कृत्रिम पाऊस? जाणून घ्या सविस्तर…
१००० पाण्याचे टँकर्स घेणार
मुंबईतील वायूप्रदूषण अटोक्यात आणण्याकरता रस्त्यावरील धुळ हटवणे गरजेचे आहे. त्याकरता एक हजार पाण्याचे टँकर्स भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून मुंबईतील रस्ते दररोज धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, याकरता पुनर्वापर केलेले पाणी वापरले जाणार आहे.
कृत्रिम पावसाची आवश्यकता?
दिल्लीत प्रदुषण वाढल्याने तिथे कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता आहे. या धर्तीवर मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मुंबईत कृत्रिम पावसाची आवश्यकता नाही. कालच (८ नोव्हेंबर) मुंबईत पाऊस पडला. परंतु, पुढे आवश्यकता भासल्यास त्यासंबंधीच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >> “घटनाबाह्य खोके सरकार घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, कारण…”, आदित्य ठाकरे यांची टीका
बांधकाम थांबवणार का?
मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत.परिणामी धुळीचे साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे मुंबईतील बांधकामांना तत्काळ थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जातेय. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, बांधकामाशेजारी असलेले डेब्रिज, माती हटवण्याचे निर्देश दिले आहेत. माती आणि डेब्रिज रस्त्यावर दिसू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसंच, शहरी भागात अर्बन फॉरेस्टसाठी पालिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.