लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून मुंबईतील हवेचा निर्देशांक शुक्रवारी मध्यम श्रेणीत नोंदला गेला. अंधेरी येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. ‘समीर ॲप’नुसार शुक्रवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक १२५ वर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. अनेक भागात ‘समाधानकारक’ हवेची नोंद होती.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, शुक्रवारी सकाळी अंधेरी येथील हवा निर्देशांक २९३ इतका होता. तसेच देवनार येथे २०० , घाटकोपरमध्ये ११४, बोरिवलीत १२२, भांडूपमध्ये १२८, मालाडमध्ये १७८, नेव्ही नगर कुलाबा येथे १३०, शिवडीत १२४ हवा निर्देशांक होता.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून मुंबईचा हवा निर्देशांक ७८-१०० होता. मात्र, मुंबईतील हवा शुक्रवारी काहीशी खालावली होती. आधीच उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. आता हवा खालावल्यामुळे मुंबईकरांच्या समस्येत आणखी आणखी भर पडली आहे. समाजमाध्यमावर शुक्रवारी खालावलेल्या हवेबाबत चर्चा सुरू होती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगले’, ५१-१०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.

दरम्यान, नोव्हेंबर – डिसेंबर या कालावधीत मुंबईतील हवेच्या दर्जाची ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. काही भागांतील बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच महानगरपालिका प्रशासनाने हवेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तसेच विविध मार्गदर्शक तत्वेही लागू केली.

बोरिवली, भायखळ्याची हवा ‘समाधानकारक’

काही दिवसांपूर्वी बोरिवली आणि भायखळामध्ये सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत हवा नोंदली जात होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बोरिवली पूर्व आणि भायखळ्यामधील बांधकामांवर बंदी घातली होती. त्यानंतर येथील हवेच्या दर्जात सुधारणा झाली. शुक्रवारी येथील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली होती. भायखळा येथील हवा निर्देशांक १००, तर बोरिवली येथील ९० होता.

नागरिकांनी काय करावे?

  • दीर्घकाळ प्रदूषित हवेत काम करू नका.
  • अती श्रमाची कामे टाळा.
  • सर्दी, खोकला असलेल्यांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
  • श्वसनाचे विकार असलेल्यांनी प्रदूषित हवेत बाहेर पडणे टाळावे.