मुंबई : राजधानी दिल्लीप्रमाणेच भाजपने मुंबईत लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चित करताना धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक या दोन खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली तर पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्याप निर्णय झालेला नाही. उमेदवारी नाकारण्यात आल्याने बोरिवलीमध्ये खासदार गोपाळ शे्टटी यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.
मुंबईत भाजपचे तीन खासदार आहेत. यापैकी उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी आणि ईशान्य मुंबईचे मनोज कोटक यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. उत्तर मध्यच्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. पक्षाने निर्णय घेतलेला नसल्याने महाजन यांच्यासाठी अजून आशादायी वातावरण असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा >>> मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेट स्मारकासाठी ३५ कोटी ; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
उत्तर मुंबई या बालेकिल्ल्यातून पक्षाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभा सदस्य असणाऱ्या गोयल यांना दक्षिण किंवा उत्तर मुंबई या दोनपैकी एका मतदारसंघाचा पर्याय देण्यात आला होता. यापैकी उत्तर मुंबई अधिक सोपा मतदारसंघ असल्याने गोयल यांना त्याला पसंती दिली, असे सांगण्यात आले.
दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी दुसऱ्या यादीत या मतदारसंघाचा समावेश नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघावर भाजपने दावा केला असला तरी हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे. उत्तर मुंबईतून उमेदवारी नाकारल्याने खासदार गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी या वेळी शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. संसदेत शेट्टी यांनी घेतलेली भूमिका नेतृत्वाला पसंत पडली नव्हती. यामुळे शेट्टी यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकताच होती. ‘पक्षाने मला सात वेळा उमेदवारी दिली. अनेक वर्षे बरोबर काम केल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पण ही नाराजी एक-दोन दिवसांत दूर होईल, अशी प्रतिक्रिया खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली.