कुलदीप घायवट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मध्य रेल्वेचा खोळंबा प्रवाशांना इतका सवयीचा झाला आहे, की एखाद्या दिवशी काही तांत्रिक कारणामुळे सेवा खूपच विस्कळीत झाली तर आरडाओरड होते. मध्य रेल्वेवर रोज सरासरी ७० लोकलफेऱ्या रद्द होतात तर १००पेक्षा जास्त लोकलफेऱ्या विलंबाने धावतात. रोज ‘मरे’ त्याला कोण रडे, असे म्हणून प्रवासी हतबलतेने हा त्रास सहन करत असताना रेल्वे प्रशासन मात्र या विलंबाला प्रवासी जबाबदार असल्याचे सांगत आहे.

मध्य रेल्वेवर १,८१० लोकल फेऱ्या आहेत. मात्र ही आकडेवारी कागदोपत्री असून यातील ७०पेक्षा जास्त लोकल फेऱ्या दररोज रद्द होत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये २ हजारपेक्षा जास्त लोकल रद्द तर ३ हजारांहून अधिक लोकल फेऱ्या उशिराने धावल्या. एक हजारांपेक्षा जास्त फेऱ्या ब्लॉकमुळे तर उर्वरित फेऱ्या तांत्रिक बिघाड, खराब हवेमुळे रद्द झाल्या. रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ३७० फेऱ्या रद्दच असतात. हे ‘रविवारचे वेळापत्रक’ रद्द करून, आठवडाभर १,८१० फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांना दररोज मनस्तापाला सामोरे जावे लागते. लोकल विलंबामुळे सरासरी एक ते अडीच तासांचा लोकल प्रवास दोन ते साडेतीन तासांवर जातो. ठाणे-दिवा दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका सुरू केल्यानंतर, प्रवाशांना वेळेत प्रवास मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र बहुतांश जलद लोकल पारसिक बोगद्यातून जात नसल्याने, प्रवासातील ९ ते १० मिनिटे वाढली आहेत.

हेही वाचा… मेट्रो ७ अ मार्गिकेतील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला सुरुवात

मध्य रेल्वेवर लोकल फेऱ्यांचा भार वाढला आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गोंधळ झाल्याने संपूर्ण जाळे विस्कळीत होते. लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना स्वतंत्र मार्ग असणे आवश्यक आहे. मात्र जोपर्यंत प्रलंबित प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत लोकल वेळापत्रक विस्कळीतच राहील, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… अध्यक्षपद रिक्तच ;‘एमपीएससी’ला अद्याप सेठ यांची प्रतीक्षा

कल्याणमध्ये अधिक विलंब

कल्याण जंक्शनमधून कसारा आणि कर्जतकडे जाण्यासाठी दोन फाटे आहेत. लांब पल्ल्यांच्या बहुतांश गाड्या कल्याणला थांबतात. या गाड्यांचे मार्ग बदलण्यासाठी लोकल सेवा विस्कळीत होते. लांब पल्ल्याच्या गाड्यांना आधी मार्ग मोकळा करून द्यावा लागत असल्याने लोकल एका मागे एक उभ्या राहतात आणि फेऱ्यांना विलंब होतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

हेही वाचा… सूतगिरण्यांच्या कर्जाचा सरकारवर वाढता भार; १,३५१ कोटी रुपये थकीत व्याज

मध्य रेल्वेचा ९५ ते ९६ टक्के वक्तशीरपणा असून ४ ते ५ टक्के लोकल उशिराने धावतात. लोकल उशिराने धावण्याची अनेक कारणे आहेत. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडणे, फाटकांवरील रस्ते वाहतूक जास्त काळ सुरू राहणे याबरोबरच तांत्रिक कारणांनी विलंब होतो. मात्र मागील वर्षीपेक्षा बिघाडाचे प्रमाण कमी झाले आहे. — डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor management of central railway many trains are canceled daily and hundreds delayed passengers annoyed on services mumbai print news asj
Show comments