मुंबई : ‘कोविशिल्ड’ अथवा ‘कोवॅक्सिन’ची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने झालेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा घेता यावी यासाठी २८ एप्रिलपासून नाकावाटे घ्यावयाची ‘इन्कोव्हॅक’ करोना प्रतिबंधित लस उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून या लसीला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. मागील २० दिवसांमध्ये मुंबईतील केवळ ८९ जणांनी ही लस घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २८ एप्रिल २०२३ पासून ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून ‘इन्कोव्हॅक’ लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘कोविशिल्ड’ अथवा ‘कोवॅक्सिन’ची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने झालेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना ‘इन्कोव्हॅक’ लस वर्धक मात्रा म्हणून देण्यास सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेच्या २४ करोना लसीकरण केंद्रांवर ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र मागील २० दिवसांमध्ये वर्धक मात्रा घेण्यासाठी फक्त ८९ नागरिकच पुढे आले आहेत. पहिले दोन दिवस वगळता वर्धक लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.
देशात १६ जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली होती. त्यानुसार मुंबईमध्येही प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे २०२१ पासून वयवर्षे १८ वरील सर्व नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले. करोना लसीची वर्धक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यास सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २६ एप्रिल २०२३ रोजी करोना लसीची पहिली, दुसरी आणि वर्धक मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी २१ लाख ९७ हजार २६५ वर पोहोचली आहे. यामध्ये एक कोटी आठ लाख ९३ हजार ७९६ जणांनी लसीची पहिली, तर ९८ लाख १५ हजार १४७ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. मात्र वर्धक मात्रा फक्त १४ लाख ८८ हजार ३२२ जणांनीच घेतली आहे.