आतापर्यंत केवळ ३२० खड्डय़ांच्याच तक्रारी आल्याचे महापालिका सांगत असली तरी अवघ्या मुंबईच्या रस्त्यांची खड्डय़ांनी चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे नोंदवून घेण्याच्या पालिकेच्या यंत्रणेविषयीच साशंकता व्यक्त होत आहे. पालिका खड्डय़ांची नोंदणी कशी करते, याची माहिती खुद्द लोकप्रतिनिधींनाही नाही. त्यामुळे आपल्या भागात नेमके किती खड्डे आहेत याविषयी नगरसेवकही अनभिज्ञ आहेत.
गेल्या वर्षी चार जुलैपर्यंत तब्बल १४८५ खड्डय़ांची नोंद झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात खड्डय़ांनी डोके ‘वर’ काढण्यास सुरुवात केली आहे. चेंबूर येथून पूर्वमुक्त मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून वाहनांची गती मंदावली आहे. मात्र पालिकेकडील अधिकृत नोंदीनुसार या भागात केवळ एक खड्डा बुजवणे बाकी आहे.
चेंबूर एम पूर्व भागात ३८ खड्डय़ांची नोंद झाली असून एम पश्चिममध्ये पाच खड्डे नोंदले गेले आहेत. मात्र चार जुलैपर्यंत यातील केवळ एकच खड्डा बुजवणे बाकी होते. एवढेच नव्हे तर पूर्व उपनगरात आतापर्यंत केवळ ७६ खड्डय़ांची नोंद झाली असून त्यातील केवळ सहाच खड्डे शिल्लक असल्याचे पालिकेची अधिकृत नोंद सांगते. पश्चिम उपनगरात १३५ तर दक्षिण भागात १०९ खड्डय़ांच्या तक्रारी आल्या आहेत. एकूण शहरात नोंद झालेल्या ३२० खड्डय़ांपैकी केवळ ५० खड्डे शिल्लक राहिल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. त्यातील १४ खड्डे अंधेरी भागात, सहा मालाडमध्ये तर ९ कांदिवलीत आहेत.
गेल्या वर्षी ४ जुलैपर्यंत तब्बल १४८५ खड्डे नोंदले गेले होते. त्यासाठी २०११ पासून विशिष्ट सॉफ्टवेअर वापरण्यात येत होते. मात्र पालिका आयुक्तांनी या वर्षी या सॉफ्टवेअरऐवजी पालिका प्रशासनाच्या जुन्या मोबाइल अ‍ॅपवर विश्वास दाखवला.
पालिकेने खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी १२९२, १२९३ हे हेल्पलाइन क्रमांक तसेच फेसबुक हे माध्यम वापरून खड्डय़ांच्या तक्रारी करता येतात. मात्र रस्त्यांवर खड्डे असूनही नोंद होताना दिसत नाही.
गेल्या वर्षीपर्यंत खड्डय़ांची नोंदणी करण्याची यंत्रणा होती. या वेळी पालिकेने ती रद्दबातल केली.
मात्र आता संकेतस्थळावर फोटो अपलोड करण्याची यंत्रणा लोकप्रतिनिधींनाही नीटशी कळलेली नाही.
‘माझ्या घाटकोपर, मुलुंड परिसरांतील किमान ४० खड्डय़ांचे फोटो माझ्याकडे आहेत, मात्र त्यांची नोंद पालिकेकडे नाही व ते बुजवलेही गेले नाहीत. पालिकेची खड्डे नोंदीची यंत्रणा अपयशी ठरली आहे,’ असे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा म्हणाले.
आयुक्तांचा खड्डे दौरा
रस्त्यांवरील खड्डय़ांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंगळवारी खड्डय़ांची पाहणी केली.
कुलाबा, परळ, माटुंगा या परिसरांतील रामजी कमानी मार्ग, गणपतराव कदम मार्ग, लेडी जमशेदजी मार्ग, राजा बढे चौक, फाइव्ह गार्डन, मंचरजी जोशी मार्ग या रस्त्यांची पाहणी केली. खड्डे त्वरित व नीट भरले जातील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.