शतायुषी

शतायुषी हा आरोग्य विशेषांक खासच आहे. सध्या साथीच्या आजारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर विशेष विभागात या साथीच्या रोगांची माहिती देण्यात आली आहे. हे साथीचे आजार कसे पसरतात, कुणाला होतात यावर डॉ. दया मंगल यांचा लेख उपयुक्त आहे. डेंग्यू फीवर, स्वाईन फ्लू, हिपॅटायटिस- ई-सी, चिकुनगुन्या, न्यूमोनिया अशा आजारांची माहिती व त्यावरील उपाय सांगितले आहेत. तसेच डायबेटिक डाएट चार्ट, फिटनेससाठी व्यायाम, फिटनेससाठी योगा, जिना चढताना-उतरताना होणारे अपघात, काचबिंदू, उच्चशिक्षित स्त्रियांच्या आरोग्य समस्या, अल्झायमर अशा विविध आजारांविषयी उत्तम माहिती देणारा हा विशेषांक आहे. बालविभागात मुलांसाठी शाळेचा डबा, काही विशेष पाककृती उपयुक्त आहेत. आरोग्यविषयक उत्तम माहिती देणारा हा अंक आहे. – संपादक – डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. आशा संगमनेरकर, किंमत – १५०  रुपये.

 

वयम्

‘वयम्’ या खास किशोरांसाठीच्या मासिकाचा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच पाहावासा वाटतो. या अंकात कथा, कविता, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, लेख याची मेजवानी आहे. मुलांना वाचण्यासाठी वैविध्यपूर्ण असा ऐवज अंकात आहे. प्राण्यांनासुद्धा खेळायला आवडतं- सुबोध जावडेकर, हास्यचित्रांतली मुलं- मधुकर धर्मापुरीकर हे लेख, तसेच सुबोध भावे-अंजली कुलकर्णी, शेफ विष्णू मनोहर- क्रांती गोडबोले-पाटील या मुलाखती उल्लेखनीय आहेत. ‘चोच आणि चारा’ हा मकरंद जोशी यांचा लेख वाचताना पक्ष्यांच्या चोचींचा उपयोग पक्ष्यांसाठी त्यांचे हात, पाय, चमचा, फावडं असं बरंच काही असतं, यासारख्या मनोरंजक गोष्टी वाचायला मिळतात.  – संपादक – शुभदा चौकर, किंमत – ११० रुपये.

मुंबई तरुण भारत

अंकात विविध विषयांचा वेध घेण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रीयत्व या विषयावरील परिसंवादात दिलीप करंबेळकर, डॉ. मनमोहन वैद्य व डॉ.नीरज हातेकर यांचे लेख आहेत. ईशान्येतील बदलत्या राजकारणाचे चित्र पराग नेरुरकर यांनी टिपले आहे. दुभंगता पाकिस्तान या लेखात स्वाती तोरसेकर यांनी पाक सरकारच्या अमानुष राजवटीतून स्वातंत्र्याचा मार्ग चोखाळणाऱ्या चळवळींचा आढावा घेतला आहे. प्रसिद्ध साहित्यिक गोपाळ नीलकंठ यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांचे व्यक्तिमत्त्व व वाङ्मयाचा ऊहापोह प्रा. श्याम अत्रे यांनी केला आहे. इस्त्रायलच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या शिमॉन पेरेस यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारा लेख उल्लेखनीय आहे. – प्रबंध संपादक – दिलीप करंबेळकर, किंमत – १७५ रुपये.

 

हेमांगी

ब्रिटिशकालापासून अस्तित्वात असलेल्या शासन आणि संस्थात्मक व्यवस्था अर्थात ‘सिस्टीम्स’ यावर प्रकाश टाकणारा हेमांगीचा यंदाचा दिवाळी अंक त्यातील विषयांमुळे वैशिष्टय़पूर्ण झाला आहे. या व्यवस्थांमधील झालेल्या व न झालेल्या बदलांचा ऊहापोह यानिमित्ताने करण्यात आला आहे. व्यक्तिविशेष लेख, महावृक्षाच्या सावलीच्या निमित्ताने प्रसिद्ध गायकांनी केलेला त्यांच्या गुरूंचा गौरव, अर्थ व आरोग्यावरील लेख अशा पद्धतीने चौफेर वाचन करण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांचा मुंबईची दुसरी जीवनवाहिनी हा मेट्रोच्या आवश्यकतेवरील लेख आवर्जून वाचावा.  – संपादक – प्रकाश कुलकर्णी, किंमत – १५० रुपये.