२०२० मधील पॉर्न व्हिडीओ प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने राज कुंद्राची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. एकूण सहा जणांची याचिका फेटाळण्यात आली असून यामध्ये राज कुंद्रासोबत शर्लीन चोप्रा आणि पूनम पांडेचाही सहभाग आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी यावेळी आरोपांना सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.
याचिका फेटाळली गेली आहे त्यामधील इतर तिघे सुवोजित चौधऱी, उमेश कामत आणि सॅम अहमद आहेत. ६ नोव्हेंबर २०२० ला मुंबई सायबर पोलिसांनी २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ६७ वर्षीय निवृत्त कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी मधुकर केनी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
“शर्लिन आणि पूनमच्या ‘त्या’ व्हिडीओंशी काहीही संबंध नाही”, राज कुंद्राच्या वकिलांकडून युक्तिवाद
मधुकर केनी यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ ला आक्षेपार्ह सामग्री असणाऱ्या प्लॅटफॉर्मबद्दल तक्रार केली होती. सर्च इंजिनमध्ये शर्लीन चोप्रा नाव टाकण्यात आलं असता स्क्रीनवर आक्षेपार्ह व्हिडीओ येत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं.
शर्लिन चोप्राने यावेळी आपण एक व्यवसायिक महिला तसंच कलाकार असून भारतीय मार्केटमध्ये चित्रपट, शॉर्ट फिल्म्स तसंच वेब सीरिजची आणि आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी अॅडल्ड कंटेंटची निर्मिती करत असल्याचं म्हटलं. आपण फक्त अधिकृतपणे नोंद असलेल्या वेबसाईट्ससाठी काम करत असताना एफआयआरमध्ये नोंद असलेल्या पॉर्न साईट्स या कॉपीराईट्सचं उल्लंघन करणाऱ्या बनावट साईट्स असल्याचा दावा तिने केला आहे.
दरम्यान राज कुंद्राने गेल्यावर्षी एफआयआरमध्ये आपलं नाव नव्हतं, आणि आपण तपासात सहकार्य केलं असल्याचं सांगितलं. तसंच आपला यात सहभाग नसल्याचाही दावा केला आहे.