चित्रकला सामान्यांच्या घरात पोहोचावी आणि त्याचवेळेस या कलेच्या माध्यमातून नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदतही लाभावी या हेतूने संस्कार भारती, कोकण प्रांताने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमासाठी शनिवारी मुंबईकर रसिकांनी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे कलादालनात तुफान गर्दी केली. केवळ दीड हजार रुपयांत प्रसिद्ध कलावंतांकडून काढून घ्या तुमचे व्यक्तिचित्र असे या उपक्रमाचे स्वरूप होते.
प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, विजय आचरेकर, मनोज सांगळे, गायत्री मेहता आदी चित्रकार रसिकांना त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटून देत होते. एरवी या कलावंतांकडून व्यक्तिचित्र रेखाटायचे तर मोठी चार आकडी रक्कम मोजावी लागते. मात्र नेपाळ भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी कलावंतांनी केवळ दीड हजारात व्यक्तिचित्र असा हा उपक्रम राबविला. त्यासोबत कामत, आचरेकर यांच्या बरोबरच शरद तावडे, डॅनियल तळेगावकर, सुनील पुजारी विवेक प्रभूकेळुस्कर, प्रकाश घाडगे आदी कलावंतांच्या रंगचित्रांचीही कमी किमतीत विक्री येथेच केली जात आहे. तिथेही या मोठ्या कलावंतांची चित्रे अवघ्या काही हजारांत परवडणारया किमतीला उपलब्ध आहेत. या चित्रांची किंमतही एक हजार रुपयांपासून सुरू होते अशा प्रख्यात चित्रकारांची चित्रे आपल्या घरी असावीत, या ओढीने सकाळपासूनच मुंबईकर रसिकांनी इथे गर्दी केली. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. उद्या रविवारीही सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन आणि उपक्रम सुरू राहणार असून या उपक्रमात सहभागी होऊन मुंबईकर रसिकांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले आहे.

Story img Loader