मुंबई महानगरपालिकेच्या केंद्रांवर शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रेचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तासाभरातच शहरात दीड हजाराहून अधिक नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

मुंबईतील १८ वर्षांवरील नागरिकांसाठी शुक्रवारपासून मोफत वर्धक मात्रेचे लसीकरण सुरू झाले. यासाठी ‘कोविन’मध्ये गुरुवारी रात्री उशीरा आवश्यक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ‘कोविन’मध्ये कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. लसीकरणासाठी येणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ४५ वर्षांवरील आणि कामावर जाणाऱ्या तरूणांचा समावेश जास्त प्रमाणात आहे, असे वांद्रे-कुर्ला संकुल करोना केंद्रातील कर्मचाऱ्याने सांगितले.

पावसाच्या शक्यतेमुळे सकाळी लसीकरणासाठी नागरिकांची फारशी गर्दी नव्हती. परंतु हळूहळू नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. मोफत लस उपलब्ध झाल्यामुळे पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे गोरेगावच्या लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले.

पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ३० सप्टेंबरपर्यंत १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत वर्धक मात्रा उपलब्ध असेल. दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर सहा महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झालेल्यांना वर्धक मात्रा घेता येईल.