लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : सोडतील विजेत्यांना घराचा ताबा देताना म्हाडा एका वर्षाचे देखभाल शुल्क आकारते. मात्र एका विजेताला २०२३ मध्ये घराचा ताबा मिळालेला असताना त्याच्याकडून २०१४ पासूनचे चक्क १० वर्षांचे देखभाल शुल्क वसूल करण्याचा घाट म्हाडाने घातला आहे. म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या सुनावणीत ही बाब समोर आली. संबंधित विजेत्याने आपली ही व्यथा लोकशाही दिनी मांडली असून यावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच मुंबई मंडळाकडून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार वांद्रे येथील म्हाडा भवनात महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हाडाकडून लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. लोकशाही दिनी महाडा रहिवाशी आणि सर्वसामान्यांच्या म्हाडाची संबंधित तक्रारी समस्या जाणून घेतल्या जातात. या तक्रारी समस्यांचे निराकरण महाडा उपाध्यक्ष संजू जयस्वाल यांच्याकडून करण्यात येते. त्यानुसार सोमवारी महाडात लोकशाही दिन पार पडला. या लोकशाही दिनी नऊ अर्जांवर जयस्वाल यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत एका विजेत्याकडून एका वर्षाऐवजी १० वर्षांचे थकीत देखभाल शुल्क आकारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. महाडाच्या नियमानुसार घराचा ताबा देताना एका वर्षाचे आगाऊ सेवाशुल्क आकारले जाते. असे असताना एका विजेत्याला १० वर्षापासूनचे थकित देखभाल शुल्क आकारण्यात आले आहे. यासंबंधीची अर्जदार हिरेन मेहता यांनी म्हाडाकडे लोकशाही दिनी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

आणखी वाचा-मुंबई : गोखले पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार

हिरेन मेहता हे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१४ च्या सोडतील प्रतीक्षा यादीतील विजेते आहेत. दहिसर येथील नक्षत्र सहकारी संस्थेतील घरासाठी ते विजेते ठरले आहेत. प्रतीक्षा यादी कार्यान्वित होऊन मेहता यांना २०२३ मध्ये घराचा ताबा देण्यात आला. मेहता यांना २०२३ पासून पुढील एका वर्षाचे देखभाल शुल्क आकारणे क्रमप्राप्त होते. मात्र अधिकाऱ्यांनी या विजेत्याला १० वर्षाचे देखभाल शुल्क आकारले. ही शुल्क आकारणी अयोग्य असल्याची तक्रार मेहता यांनी सोमवारी लोकशाही दिनी जयस्वाल यांच्यासमोर मांडली. तसेच थकीत शुल्काची रक्कम माफ करण्याची मागणी केली. त्यानुसार जयस्वाल यांनी मेहता यांच्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करत निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत आपल्याकडे सादर करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आणखी वाचा-आधुनिक युगातील एकलव्य, इकोइंग ग्रीन फेलोशिपचा मानकरी

हिरेन मेहता यांच्या अर्जावर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देतानाच जयस्वाल यांनी देखभाल शुल्क संदर्भात अशा आणखी काही तक्रारी आहेत का याचा शोध घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच या तक्रारींचेही तात्काळ निवारण करण्याचे निर्देश दिले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सर्वसामान्यांना म्हाडाच्या कार्यालयात खेटे घालावे लागू नये असे काम करा अशा शब्दात जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possession of house in 2023 but maintenance charges from 2014 mumbai print news mrj