मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमाल – किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी सध्या राज्यभरात असलेली थंडी कमी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमीळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येऊन रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण जास्त काळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारपासून पुढील पाच दिवस राज्यातील कमाल – किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> कर्नाक पूल जूनमध्ये सुरु होणार; पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा परिणाम पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशावर होऊन तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. पण, त्याचा थेट परिणाम राज्यातील तापमानावर होण्याची शक्यता नाही.
हेही वाचा >>>टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न
विदर्भात पारा दहा अंशांवर राज्यात गुरुवारी नागपूर आणि गोंदियात सर्वात कमी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात किमान तापमान सरासरी दहा अंशांवर आले आहे. वर्धा १०.५, चंद्रपूर ११.८, छत्रपती संभाजीनगर १२.०, कुलाब्यात २१.६, सांताक्रुजमध्ये १८.४, पुण्यात १३.३, नगर ११.५, जळगाव १०.३ आणि महाबळेश्वरात १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.