लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई तसेच उपनगरांत थंडीने जोर धरला होता. मात्र किमान तसेच कमाल तापमानात चढ उतार सुरु होऊन मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस इतके राहील.
किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबईत गारठा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, गुरुवारी राज्याच्या किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच उत्तर भारतात ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके राहील. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात थंडी जाणवू शकेल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी २१.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
आणखी वाचा-मुंबई : क्रीप्टो करन्सीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून रहिवाशाची फसवणूक
१ फेब्रुवारीनंतर किमान तापमान १६ अंशाखाली जाईल ४ फेब्रुवारीपर्यंत ही घट कायम राहील.त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पार १७ ते१९ अंश सेल्सिअसवर जाईल. या कालावधीत कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असेल.