इंद्रायणी नार्वेकर
चीनमधील करोना विषाणूचा फटका पालिकेच्या सागरी किनारा महामार्ग प्रकल्पालाही फटका बसण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी बोगदा खणण्यासाठी चीनहून टनेल बोअिरग मशीन आणण्यात येणार आहे. मात्र सध्या करोनामुळे चीनमधील आयात थांबवलेली असल्यामुळे हे मशीन आणणे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सागरी किनारा मार्गाच्या कामावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती डिसेंबर २०१९ मध्ये उठवण्यात आली. या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. भरावाचे काम आणि खोदकामाने वेग घेतला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे वरळीकडील टोक या दरम्यान ९.९८ किमीचा सागरी रस्ता बांधण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे पाच महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण बंद होते. आता हे काम सुरू झाल्यानंतर करोनाने त्यात अडथळा आणला आहे.
या सागरी मार्गामध्ये भराव, पूल, बोगदे असे गुंतागुंतीचे बांधकाम आहे. त्यात ३.४५ मीटरचे दोन बोगदे खणण्यात येणार आहेत. हे बोगदे खणण्याचे काम ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार होते. त्याकरिता खास चीनहून टीबीएम आणण्यात येणार आहे. एप्रिलपर्यंत हे मशीन मुंबईत समुद्रमार्गे आणण्यात येणार आहे. मात्र आता ‘करोना’मुळे निर्माण झालेली स्थिती पूर्ववत होत नाही तापर्यंत हे मशीन इथे आणता येणार नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे मशीन आणण्याआधी मशीन जमिनीत उतरवण्यासाठी कित्येक फूट खोल खणावे लागणार आहे. मात्र न्यायालयाच्या स्थगितीमुळे हे कामही रखडले आहे. मात्र ऑगस्टपर्यंत बोगदा खणण्याचे काम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील सागरी रस्त्यावर प्रत्येकी ३.४५ मीटरचे दोन बोगदे (टनेल) समुद्राच्या खालून असणार आहेत. या बोगद्यामध्ये वाहनांसाठी तीन लेन असतील. हे बोगदे मेट्रो रेल्वेसाठी खणलेल्या बोगद्यांपेक्षा मोठे आणि मेट्रो रेल्वेपेक्षा या बोगद्यांचा व्यास मोठा आहे. मेट्रोच्या बोगद्याचा व्यास हा पाच ते सहा मीटरचा आहे तर सागरी मार्गाच्या बोगद्याचा व्यास ११ ते १२ मीटरचा आहे त्यामुळे तेवढा मोठा व्यास असलेले हे मशीन असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मरिन ड्राइव्ह, मलबार हिल व प्रियदर्शिनी पार्क येथे हे बोगदे बांधण्यात येणार आहेत. प्रियदर्शिनी पार्क येथून बोगदा खणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
एकूण १३,००० कोटींच्या या प्रकल्पासाठी पालिकेने अर्थसंकल्पात २००० कोटींची तरतूद केली आहे. २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.