मुंबई : सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या अटल सेतूचे (शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू महामार्ग) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. मात्र या मार्गामुळे शिवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच या मार्गावर पालिकेने अद्याप दिशादर्शक चिन्हेही लावलेली नाहीत. त्यामुळे लोकार्पणानंतर या मार्गाचा वापर करणाऱ्यांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवडी नाव्हाशेवा सागरी सेतूनचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी १२ जानेवारीला या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावरून ये – जा करण्यास सुरूवात होईल. मात्र वाहनांना योग्य दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सोमवारपर्यंत दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. येथे दिशादर्शक फलक तातडीने लावावे, अशी मागणी शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. पालिकेच्या पूल विभागाला त्यांनी तसे पत्र पाठवले आहे. तसेच पूर्व मुक्त मार्गावर सध्या असलेले दिशादर्शक फलकही बदलण्याची आवश्यकता असल्याचेही पडवळ यांनी पत्रात म्हटले आहे. दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहने चुकीच्या मार्गाने जातील व त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. याबाबत एमएमआरडीने देखील पालिका प्रशासनाला निर्देश दिले असून त्याची सोमवारी संध्याकाळपर्यंत अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत पालिका प्रशासनाला हे दिशादर्शक फलक युद्धपातळीवर लावावे लागणार आहेत.

हेही वाचा >>>मुंबई : मराठा सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या अभियंत्यांना जुंपले

ऑरेंज गेट येथून पूर्व मुक्त मार्गावर आल्यानंतर थेट वाशी आणि मानखुर्दकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावलेले आहेत. मात्र आता यात बदल करावा लागणार आहे. अटल सेतूकडे जाण्यासाठी या मार्गावरून कॉटन ग्रीनला खाली उतरावे लागणार आहे. नंतर गाडीअड्डावरून सागरी सेतूकडे जावे लागणार आहे. परंतु, त्याकरीता तसे दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनचालक थेट वाशी, मानखुर्दपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा मागेही येता येणार नाही. त्यामुळे तातडीने हे दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.

दरम्यान, कॉटन ग्रीन अग्निशमन केंद्राशेजारीच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वाहतनतळाची जागा आहे. या ठिकाणी आधीच दररोज हजारो वाहने येत-जात असतात. दोन्ही ठिकाणाहून वाहनांचा प्रवाह वाढल्यामुळे झकेरिया बंदर रोड, नाथ पै मार्ग, दत्ताराम लाड मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद््भवू शकते. त्यामुळे बीपीटीमधील वाहनतळावर येणाऱ्या गाड्यांना रे रोडवरून ये – जा करण्याची व्यवस्था करावी व कॉटन ग्रीन येथे केवळ सागरी सेतूवर जाणाऱ्या वाहनांना जागा करून दिल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, असे पडवळ यांनी एमएमआरडीएला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.