काँग्रेस-राष्ट्रवादीत लोकसभा जागावाटपाचे मागील सूत्र कायम ठेवण्यात येणार असून, केवळ राज्यातील काही काँग्रेस नेते मागतात म्हणून २६ काँग्रेस आणि २२ राष्ट्रवादी या सूत्रात बदल होणार नाही, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तीन-चार जागांची अदलाबदल शक्य आहे, असेही त्यांनी सूचित केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीतजागावाटपावरून सध्या वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादीने मात्र २२ जागा लढण्याची तयारी केली असून, रविवार आणि सोमवार दोन दिवस शरद पवार हे या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना पटेल यांनी जागावाटपाचे सूत्र अंतिम असून, नवी दिल्लीत काँग्रेसच्या संबंधित नेत्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीला २२ जागा सोडण्याच्या विरोधात आहेत याकडे लक्ष वेधले असता पटेल म्हणाले, दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस नेत्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. जागावाटपाच्या सूत्राला राहुल गांधी यांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी त्यांचा विरोध असेल असे वाटत नाही, असा दावाही पटेल यांनी केला.
जागावाटपाचे सूत्र अंतिम असले तरी काही जागांची आदलाबदल होऊ शकते. असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे. या संदर्भात काँगेसच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल, असेही पटेल यांनी सांगितले.
सूत्र अद्यापही अंतिम नाही – ठाकरे
जागावाटपाचे सूत्र अंतिम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत असले तरी अ. भा. काँग्रेस समितीकडून तशी काहीही माहिती अद्याप राज्यातील नेत्यांना देण्यात आलेली नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी आपण व मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पक्षाच्या केंद्रीय पातळीवरच आघाडी आणि जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.