लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भारतीय आणि क्रिकेट हे अतूट नाते आहे. खुले मैदान असो किंवा गल्लीबोळातील चाळ, विविध ठिकाणी क्रिकेट हा खेळ मोठ्या उत्साहात खेळला जातो. तसेच अनेकजण लहानपणापासूनच क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात. यादरम्यान अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेकांना कुटुंबातील सदस्यांकडून ओरडा खावा लागतो. मात्र आता ‘क्रिकेट’मध्येच पदवी शिक्षण घेता येणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने लवकरच ‘क्रिकेट’ विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे, ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने ‘एमसीए’ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात नजीकच्या काळात सामंजस्य करार होणार आहे.
मुंबईत क्रिकेट हा खेळ आणखी समृद्ध करणे, उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि क्रिकेटसंबंधित पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या अनुषंगाने ‘एमसीए’ने कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विविध निर्णय घेतले. ‘क्रिकेट’मध्ये पदवी शिक्षण हा त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय आहे. क्रिकेट या खेळात आपले करिअर बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून खेळपट्टी तयार करणे, क्रिकेटसंबंधित विषयावरील विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध गोष्टींबाबत अधिक माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी जवळपास दहा हजार मुलांना नोंदणी करण्यात येणार असल्याचे समजते.
‘आम्ही मुंबईतील क्रिकेटच्या समृद्ध विकासासाठी वचनबद्ध आहोत. कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांचा युवा खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे. तसेच क्रिकेटसंबंधित पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व सर्वसमावेशक अनुभव देण्यात येईल. या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील’, असे ‘एमसीए’चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.