पत्र पोहोचविण्याबरोबर मुदत ठेवीसारख्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातही पाय रोवून असलेल्या टपाल विभागाने आता बँकिंग क्षेत्रातही उडी मारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़  नवी बँक सुरू करण्यासाठीचा परवाना मिळविण्यासाठीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली़  ग्रामीण भागात सर्वदूर पोहोच असलेले टपाल खाते बँकिंग क्षेत्रात उतरल्यास ग्रामीण भारताला मुख्य आर्थिक प्रवाहाशी जोडणे सोपे होणार आह़े  
नवी बँक सुरू करण्याचे परवाने मिळविण्यासाठी अर्ज करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून १ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आह़े  त्यामुळे हा कालावधीत संपण्यापूर्वी टपाल खात्याकडून मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आह़े  त्यानंतर परवाना मिळविण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती टपाल सेवा मंडळच्या सदस्या सुनीता त्रिवेदी यांनी सांगितल़े
नव्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी टपाल विभागाने मार्गदर्शक संस्थांच्या माध्यमातून बँक ही पूर्ण संकल्पना अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़  या क्षेत्रात प्रवेशासाठीची सगळी माहिती गोळा करण्यात आली आह़े  आर्थिक समावेशकता वाढविणे हा जर नव्या बँकांसाठी परवाने देण्यामागचा रिझव्‍‌र्ह बँक आणि शासनाचा उद्देश असेल, तर टपाल विभागाची या क्षेत्रातील उडी फारच लाभाची ठरेल, असे मत अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आह़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेच्या शाखांच्या चौपट
३१ मार्च २०१३ पर्यंत देशभरात टपाल विभागाच्या १ लाख ५४ हजार ८२२ शाखा होत्या आणि त्यातील १ लाख ३९ हजार ८६ शाखा ग्रामीण भागात आहेत़  या शाखांची संख्या देशातील एकूण बँकिंग क्षेत्राच्या ग्रामीण भागातील शाखांच्या चौपट आह़े

अर्थखाते मात्र साशंक
बँकेत परावर्तित होण्याच्या टपाल खात्याच्या क्षमतेबाबत अर्थमंत्रालयाकडून शंका व्यक्त करण्यात आली असल्याचेही सूत्रांकडून कळत़े  वित्त सेवा विभागाचे सचिव राजीव टक्रू यांनी टपाल खात्याच्या या स्थित्यंतरात फारसा रस दाखविलेला नाही़  लोकांपर्यंत पोहोच आणि बचत खाती उघडणे या पलीकडे बँकांना अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी कराव्या लागतात़  भारतात ही संकल्पना कदाचित यशस्वी ठरणार नाही, असे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post office banking sector