टपाल कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ते सोडवण्याऐवजी दिलेले काम मुदतीत संपवण्यासाठी वरिष्ठांकडून छळ होत असल्याने ‘ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन’ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असून या आंदोलनाचा कार्यक्रम संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरवण्यात आला. हे आंदोलन २३ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मोठे होत जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ ऑक्टोबरपासून विभागीय कार्यालयांतील कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार आहेत.
सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून हे कर्मचारी काम करताना काळ्या फिती लावणार आहेत. हा टप्पा दोन दिवसांचा असून त्यानंतर २६ आणि २७ सप्टेंबर रोजी जेवणाच्या वेळेत विविध ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील. त्यालाही यश आले नाही, तर ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाचच्या दरम्यान विभागीय कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येईल. ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान कर्मचारी साखळी उपोषण करतील आणि अंतिम टप्प्यात ११ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण पुकारण्यात येईल. सर्व विभागांचे संगणकीकरण, ठरावीक कालावधीत बैठका, कर्मचाऱ्यांवर लादलेली ‘टार्गेट’ अशा काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Story img Loader