मुंबई : कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला (डीआरपीपीएल) देण्यास विरोध करीत कुर्लावासियांनी सोमवारपासून पोस्टकार्ड आंदोलन सुरू केले आहे. मदर डेअरीची जागा डीआरपीपीएलला देण्याचा शासन निर्णय रद्द करावा आणि मदर डेअरीची संपूर्ण २१ हेक्टर जागेत उद्यान विकसित करावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून करण्यात येणार आहे. हे आंदोलन महिनाभर सुरू राहणार असून किमान पाच हजार पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्धार कुर्लावासियांनी केला आहे.
धारावी पुनर्विकासाअंतर्गत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी धारावी बाहेरील विविध ठिकाणच्या जागेची मागणी डीआरपीपीएलकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीनुसार राज्य सरकारने नुकतीच डीआरपीपीएलला मदर डेअरीतील २१ हेक्टरपैकी ८.५ हेक्टर जागा दिली आहे. कुर्ल्यातील रहिवाशांनी ही जागा डीआरपीपीएल वा इतर कोणालाही देण्यास कडाडून विरोध केला आहे. कुर्ल्यात मोकळ्या जागा कमी असल्याने मदर डेअरीची जागा उद्यान, मोकळी जागा म्हणून विकसित करण्याची मागणी कुर्लावासियांनी ‘लोक चळवळ’च्या माध्यमातून केली आहे. या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारपासून पोस्टकार्ड आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती ‘लोक चळवळी’कडून देण्यात आली. निवासी संकुल आणि विविध नाक्यांवर लोक चळवळीचे कार्यकर्ते पोस्टकार्ड लिहून घेत आहेत. आता महिनाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे. किमान पाच हजार पोस्टकार्ड पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचेही ‘लोक चळवळी’कडून सांगण्यात आले.
हेही वाचा – मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम
हेही वाचा – मुंबई : ट्रकच्या अपघातात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
लवकरच मुलुंड, कुर्ला आणि धारावीवासीय रस्त्यावर
धारावीच्या बाहेर अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यावर धारावीकरांचा विरोध आहे. तर मुलुंड, कुर्ला येथे धारावीकरांचे पुनर्वसन करण्यास मुलुंड, कुर्लावासियांनी विरोध केला आहे. आता मुलुंड, कुर्ला आणि धारावीकर एकत्र येणार आहेत. लवकरच मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.