‘हॉटेल विहंग इन’ अनधिकृत बांधकाम प्रकरण
घोडबंदर रोडवरील ‘हॉटेल विहंग इन’मध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत सापडले असतानाच, त्यांच्याशी संबंधित असलेल्या विहंग बिल्डर्स, विहंग इन्फ्रास्ट्रक्चर, व्ही. एन. डेव्हलपर्स, विहंग हॉस्पिटॅलिटी अशा कंपन्यांमध्ये भागीदार, संचालकयांसारखी महत्त्वाची पदे भूषविणारी त्यांची पत्नी, नगरसेविका परिषा आणि नगरसेवक मुलगा विहंग यांच्या पदांवरही गंडांतर येण्याची शक्यता येथील राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
‘हॉटेल विहंग इन’मध्ये झालेले अनधिकृत बांधकाम येत्या १५ दिवसांत काढून टाकण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या किंवा संबंधित कंपनीत लाभार्थी असणाऱ्या लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे.सरनाईक कुटुबीयांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भागीदारी असून ज्या कंपनीमार्फत अनधिकृत बांधकाम झाले आहे त्यामध्ये विहंग तसेच परिषा सरनाईक यांचा सहभाग आहे का, याची चाचपणी महापालिकेने सुरू केली आहे. विहंग यांची विहंग कुबेर हॉस्पिटॅलिटी या कंपनीत पाच टक्के भागीदारी असून विहंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ते सहा लाखांच्या वार्षिक वेतनावर संचालक या पदावर काम पाहत आहेत. विहंग युनिव्हर्सल तसेच विहंग हॉस्पिटॅलिटी एल. एल. पी. या कंपनीतही त्यांची २५ टक्के भागीदारी आहे. तर परिषा सरनाईक व्ही. एन. डेव्हलपर्स आणि व्ही. एन. एन्टरप्रायजेस या कंपनीत भागीदार असून विहंग कुबेर हॉस्पिटॅलिटी या कंपनीतही त्यांची भागीदारी आहे. त्यामुळे हे दोघे लाभार्थी ठरतात का, याची चाचपणी सुरू असल्याचे समजते.

‘पदावर गंडांतराचा प्रश्नच नाही!’
‘हॉटेल विहंग इन’मध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा महापालिका करीत असली तरी हा दावा मला मान्य नाही. जनरेटरसाठी शेड उभारण्यात आली असून, त्यासाठी महापालिकेकडे रीतसर परवानगी मागितली आहे, ती त्यांनी द्यायला हवी, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तसेच ज्या कंपनीच्या माध्यमातून वाढीव बांधकाम करण्यात आले, त्याच कंपनीचे परिषा आणि विहंग हे संचालक आहेत, हे कसे सिद्ध होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या दोघांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.