मुंबईत बुधवारपासून पावसाने धरलेला ताल, पाण्यात गेलेले सखल भाग आणि विस्कळीत झालेल्या वाहतुकीने संत्रस्त झालेल्या मुंबईकरांपुढे आता खड्डय़ांचे संकट उभे ठाकले आहे. पहिल्याच माफक पावसात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहेत. १ जूनपासून आजपर्यंत शोध घेऊन मुंबईतील ११३५ खड्डे पालिका अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडले. मात्र हे सर्व खड्डे पालिकेला बुजवता आलेले नाहीत.
मुंबईमधील खड्डे शोधण्यासाठी प्रोबिटी सॉफ्टवेअर कंपनीच्या संगणक प्रणालीची मदत घेण्यात येत आहे. मोबाइलवरून काढलेले खड्डय़ाचे छायाचित्र प्रोबिटी सॉफ्टवेअरच्या संगणक प्रणालीद्वारे पालिका अधिकाऱ्यांना उपलब्ध होते. मोजमापे घेतल्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांवर सोपविण्यात येते. बुजविलेल्या खड्डय़ाची छायाचित्रे संगणक प्रणालीवर उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अधिकारी कामाची खातरजमा करून घेतात. पालिका अधिकाऱ्यांनी १ जूनपासून मुंबईतील खड्डय़ांची शोधमोहीम हाती घेतली. मात्र केवळ ११३५ खड्डे त्यांना ‘दिसले’. त्यापैकी १००९ खड्डय़ांची पाहणी करून ते बुजविण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आणि ९२४ खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले. परंतु ८३० खड्डे बुजविण्यात आले असून ३०५ खड्डे ‘जैसे थे’ आहेत.
पाणीकपातीचे संकट कायम
दिवसभर पाऊस रिमझिम झाला तरी तलावक्षेत्रात त्याने कृपादृष्टी केली नसल्याने पाणीकपातीचा प्रश्न कायम आहे. पावसाचा जोर दोन दिवसांनी पुन्हा वाढू शकेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्याच्या अंतर्गत भागात तो चांगल्या प्रकारे सक्रिय होण्यासाठी पुढील आठवडा उजाडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा