लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. याप्रकरणी कंत्राटदार जे. कुमारला ५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जोपर्यंत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नाही, तोपर्यंत दिवसाला १० लाख रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे.

बीकेसीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग दरम्यान १.२६ किमी लांबीचा उन्नत रस्ता बांधण्यात आला. या उन्नत रस्त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२३ मध्ये करण्यात आले. हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊन दीड वर्ष होत नाही तोच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आणखी वाचा-Worli Murder Case : चुलबुल पांडेची ‘गजनी’ स्टाईल! पायावर गोंदवून ठेवली होती शत्रूंची नावे, तर डायरीत…; वरळी हत्याप्रकरणात पाच जणांना अटक

रस्ता बंद करतानाच कंत्राटदार मेसर्स जे. कुमारला तात्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश देऊन ५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे एका दिवसात खड्डे बुजवले नाही, तर जोपर्यंत खड्डे बुजवून रस्ता वाहतूक सेवेत दाखल होत नाही तोपर्यंत दिवसाला १० लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

‘कारणे दाखवा’

खड्डेप्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात कडक कारवाई करतानाच एमएमआरडीएच्या उपअभियंत्याविरोधातही एमएमआरडीएने कारवाई केली आहे. उपअभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on mtnl lbs route elevated road in bkc 50 lakhs fine to the contractor mumbai print news mrj