मुंबई महापालिकेने मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. शहरभर चाललेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी होते आहे. हाती घेतलेली कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून गेल्या सात दिवसात अडीच हजार रेडी मिक्स कॉंक्रीट मिक्सर वाहनांद्वारे कॉंक्रीटचा पुरवठा मुंबईत करण्यात आला आहे. तब्बल १८ हजार ५६० घनमीटर सिमेंट कॉंक्रीट वापरण्यात आले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा वेग वाढवण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांंपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या आहेत. ही कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे एकाचवेळी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. मुंबईत एकूण दोन हजार किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबईत आताच्या घडीला कोणत्याही विभागात गेलात तरी कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी खोदलेला एक तरी रस्ता तुमच्या वाटेला येतो. संपूर्ण मुंबईतील तब्बल ३५ टक्के रस्त्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

ही कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे सध्या मुंबईत युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेची यंत्रणा वेगाने काम करत आहे. दररोज सरासरी ३७८ रेडीमिक्स काँक्रिट मिक्सर वाहनांचा वापर करून कॉंक्रीटचे मिश्रण मुंबईत आणले जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे ध्येय ठेवून, सिमेंट काँक्रिट रस्ते तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. काँक्रिटचे रस्ते डांबराच्या रस्त्यांपेक्षा अधिक टिकतात. ते अवजड वाहतुकीला आणि हवामानातील बदलांना जास्त चांगले तोंड देतात. एकदा का काँक्रिटचा रस्ता तयार झाला की त्याची देखभाल दुरुस्ती करायचा खर्च फार कमी असतो आणि वेळोवेळी दुरुस्तीची गरजही कमी भासते. मुंबईतील भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, वाहतुकीचा भार इत्यादी बाबी लक्षात घेता डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रिटचे रस्ते हा अधिक चांगला पर्याय ठरतो आहे.

यंदा पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पर्यंत अधिकाधिक रस्ते काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे. काँक्रिटच्या कामाचा दर्जा अत्युच्च असावा याकडे काटेकोर लक्ष दिले जात आहे. गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासण्या केल्या जात आहेत.

अवाढव्य काम ….अवाढव्य यंत्रणा

दिनांक १७ ते २३ एप्रिल २०२५ या ७ दिवसांच्या कालावधीत २ हजार ६५० रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच दररोज सरासरी ३७८ रेडी मिक्स काँक्रिट मिक्सर वाहनांमधून कॉंक्रिट मिश्रणाचा पुरवठा झाला आहे. यानुसार तब्बल १८ हजार ५६० घनमीटर सिमेंट काँक्रिट वापरण्यात आले आहे.