मुंबई : आरे दुग्ध वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होऊन दोन महिनेही झालेले नाहीत. मात्र, पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात हा रस्ता खड्डेमय झाला आहे. दरम्यान, रस्ते दुरुस्तीकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

आरे बाजारपेठ ते रॉयल पाम्सकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मे महिन्यात करण्यात आले होते. या दरम्यान, आरे दुग्ध वसाहतीतील अंतर्गत रस्ताही खड्ड्यांनी भरलेला असल्याचे स्थानिकांनी लक्षात आणून दिले. रहिवाशांना खराव रस्त्यावरून प्रवास करावा लागतो हे लक्षात घेऊन या रस्त्याची दुरुस्ती मे महिन्यातच करण्यात आली होती. दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. रस्त्याच्या सद्यस्थितीवरून रस्ता दुरुस्तीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात असून निकृष्ट कामासाठी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले.

हेही वाचा : परेल येथे झाड पडून महिला ठार; दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी आरे दुग्ध वसाहतीतील अंतर्गत रस्ते अत्यंत दयनीय स्थितीत आहेत, असे निरिक्षण नोंदवून त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. आरे दुग्ध वसाहतीत २७ आदीवासी पाडे असून गाईंचा गोठा आणि रॉयल पाम्सचा परिसर यांचा समावेश आहे.