पुरोगामी विचारांवर विश्वास असणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर सरकारला जादूटोणाविरोधी विधेयकासाठी वटहुकूम काढण्याचे शहाणपण सुचले. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहेत. सरकारला कशाविषयी काही देणघेणे नाही. गेंडय़ाच्या कातडीच्या या दिवटय़ांना दूर करण्यासाठी सत्तापरिवर्तन करावेच लागेल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांनी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. धर्म, प्रथा तसेच श्रद्धेवर विश्वास ठेवा. परंतु भोंदू बाबांपासून सावध राहा, असे आवाहन करत थोतांडाच्या मागे लागू नका, असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. ग्रह, तारे शास्त्र म्हणून ठीक आहे. परंतु हे शास्त्र कोण सांगतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात चांगले-वाईट दिवस येतात. मध्यंतरी मलाही काही जणांनी वेगवेगळ्या खडय़ांच्या अंगठय़ा घालावयास भाग पाडले. मूतखडय़ाची अंगठी तेवढी शिल्लक राहिली होती. या अंगठय़ा घालून माझा ‘मोगॅम्बो’ झाला होता. एकेदिवशी मी सगळ्या अंगठय़ा गोळा करून समुद्रात बुडविल्या. धर्म, श्रद्धा याच्या किती आहारी जायचे, याविषयी काही मर्यादा बाळगण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोठय़ा श्रद्धेने पूजन करायचे आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत दारू पिऊन तर्र व्हायचे, ही कसली श्रद्धा असा सवाल करत अपले घर आधी सुधारण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
एकदा गृहखाते काढून घेतलेल्या माणसाकडे पुन्हा तेच खाते सोपवले जाते. राज्याचे पोलीस खाते सांभाळतील असा कोणता वकूब आर. आर. पाटील यांच्याकडे आहे, पोलीस दलात भरती करताना उंची, छाती मोजतात. यांच्याकडे तेही नाही. कशाच्या आधारावर यांना गृहमंत्री केले हे लोकांना कळू द्या, अशा शब्दात राज यांनी आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली. बलात्कार कुठेही झाला तर वाईटच. असे असताना दिल्लीत बलात्कार झाला की निर्भयाचे आंदोलन करणारे मीडियावाले कोल्हापुरात अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार होतो त्याचे वार्ताकन का करत नाहीत. बलात्काराचा टीआरपी ठरविणारे हे कोण असा प्रश्न करत राज यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली.
काही माध्यमांच्या वेबसाईटवर मनसेचे उमेदवार जाहीर केले जात आहेत. यांना हा अधिकार कुणी दिला. उद्या यांचे संपादक, वार्ताहर मी जाहीर करू का, असा टोलाही राज यांनी लगावला.
पुन्हा परप्रांतीयांना लक्ष्य
परराज्यातून आदळणाऱ्या लोंढय़ामुळे देशातील सर्वच शहरांचा विचका होतो आहे. बिहार एकेकाळी नालंदा विद्यापीठासाठी प्रसिद्ध होते, आता ते गुन्हेगारांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. मुंबईत सध्या पोलिसांची संख्या ३५ हजार आहे, तर लोकसंख्येचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला आहे. बाहेरून येणाऱ्या लोंढय़ांचे देशातील सर्वाधिक प्रमाण ठाणे जिल्ह्य़ात आहे. वाट्टेल त्या मार्गाने बाहेरून लोंढे आदळत असताना आकार नसलेली शहरे वाढत आहेत. मते मिळवण्यासाठी झोपडय़ा उभारायच्या, पुढे बिल्डरांच्या फायद्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवायची, असा खेळ सुरू आहे. ठाण्यासारख्या शहरात एवढय़ा मोठय़ा संख्येने कुणी बेकायदा घरे बांधली, असा सवाल करत बांधणाऱ्यांपैकी कुणाला शिक्षा झाली नाही तर या घरांमध्ये राहत असलेले रहिवासी शिक्षा भोगत आहेत, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा