विदर्भातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या फटक्याने बंद पडलेले चंद्रपूर वीजप्रकल्पातील संच आता सुरू होत असून सोमवारी ५०० मेगावॉटचा एक संच सुरू झाला. तर दुसरा ५०० मेगावॉटचा संच एक-दोन दिवसांत सुरू होणार आहे.
‘महानिर्मिती’चे कोळशावर आधारित २९ वीजनिर्मिती संच असून त्यांची एकत्रित क्षमता ६९८० मेगावॉट आहे. त्यापैकी ११ संच हे वार्षिक दुरुस्ती, ओला कोळसा, अपुरा कोळसा आदी कारणांमुळे बंद आहेत. त्यात पुराच्या पाण्याचा फटका बसलेल्या चंद्रपुरातील वीजप्रकल्पाचाही समावेश
आहे.
परिणामी कोळशावर आधारित वीजप्रकल्पांमधून २७५८ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. तर उरण वीजप्रकल्पातून सरासरी ४४५ मेगावॉट तर जलविद्युत प्रकल्पातून ३१० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. अशारितीने ‘महानिर्मिती’कडून राज्याला ३५४० मेगावॉट वीज पुरवली जात आहे.
पुराच्या फटक्यामुळे बंद पडलेला चंद्रपुरातील सात क्रमांचा ५०० मेगावॉटचा संच सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला. रात्री उशिरा त्यातून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. तर ५०० मेगावॉटचा आणखी एक संच एक-दोन दिवसांत सुरू होईल, असे ‘महानिर्मिती’च्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.
सध्या राज्यात सर्वदूर पाऊस असल्याने वीजमागणी आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत सरासरी वीजमागणी साडे दहा हजार मेगावॉटपर्यंत आली आहे. केंद्रीय कोटय़ातून राज्याला साडेतीन हजार मेगावॉट वीज मिळत असून गरजेनुसार दोन-तीनशे मेगावॉट जादा वीज घेतली जात आहे. त्यामुळे ‘महानिर्मिती’च्या औष्णिक वीजकेंद्रातून कमी वीजनिर्मिती होऊनही भारनियमनाची वेळ आलेली नाही.