या वर्षीच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची तयारी सुरू असताना ‘महावितरण’ने मागील दोन वर्षांच्या खर्चाच्या वसुलीसाठी तब्बल ४९८६ कोटी रुपयांची वीज दरवाढ मागणारा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर दाखल केला आहे. यामुळे घरगुती वीजग्राहकांवर प्रति युनिट ५२ पैसे ते एक रुपया एक पैसे इतका अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे.
राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीज दरवाढ प्रस्तावानुसार २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांच्या वीज दरनिश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तशात आता ‘महावितरण’ने २०११-१२ या वर्षांतील वाढीव खर्चापोटी ११३६ कोटी रुपये आणि २०१२-१३ साठी ३८५० कोटी रुपये अशा रितीने मागील दोन वर्षांच्या महसुली तुटीपोटी ४९८६ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीची मागणी करणारा प्रस्ताव आयोगाकडे दाखल केला आहे. त्याची तांत्रिक छाननी आता आयोगासमोर होणार आहे. त्यानंतर अंतिम रक्कम निश्चित होऊन या प्रकरणावर जाहीर सुनावणी होईल.
या ४९८६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांवर प्रति युनिट एक रुपया एक पैशाचा, तर दरमहा १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांवर प्रति युनिट ५२ पैसे इतका वाढीव बोजा टाकण्याचे ‘महावितरण’ने प्रस्तावित केले आहे. दरमहा ३०० युनिट ते ५०० युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांवर प्रति युनिट ६८ पैशांचा बोजा प्रस्तावित आहे.
या प्रस्तावामुळे दरमहा ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या सामान्य घरगुती वीज ग्राहकांना महिन्याला १०१ रुपये ते दीडशे रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, तर ३०० युनिट ते ५०० युनिट वीजवापर असलेल्यांना २०४ रुपये ते ३४० रुपये जादा मोजावे लागतील.
१२ हजार कोटींच्या दरवाढीनंतर पुन्हा नवा बोजा
वीज आयोगाने ऑक्टोबर २०११ च्या दरवाढ आदेशानुसार ३६७० कोटी रुपयांची वीज दरवाढ मंजूर केली होती, तर २०१२ मध्ये ८४०४ कोटी रुपयांची दरवाढ मंजूर झाली. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत एकूण १२ हजार कोटी रुपयांची दरवाढ ‘महावितरण’ला मिळाली. यानंतर पुन्हा त्या दोन वर्षांच्या तुटीपोटी हा ४९८६ कोटी रुपयांचा दरवाढीचा प्रस्ताव ‘महावितरण’ने आणला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power tariff goes up in mumbai
Show comments