मुंबई : शिवडी – वरळी उन्नत रस्त्याच्या कामाअंतर्गत प्रभादेवी पूल बंद करून त्याचे पाडकाम करण्यासाठी, तसेच त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ‘ना हकरत’ प्रमाणपत्र दिले. वाहतूक पोलिसांनी १५ एप्रिल २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे १५ एप्रिल रोजी पूल वाहतुकीसाठी बंद होणार असून तब्बल २० महिने हा पूल बंद राहणार आहे. नवीन द्विस्तरीय पूल तयार झाल्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये त्यावरून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. दरम्यान, ‘ना हकरत’ प्रमाणपत्र मिळाल्याने आता पुढील आठवड्यात पुलाच्या पाडकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शिवडी-वरळी उन्नत रस्त्याअंतर्गत नवीन पूलाची बांधणी
दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबईत पोहचता यावे अर्थात अटल सेतूवर जाता यावे यासाठी एमएमआरडीएने शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे काम हाती घेतले आहे. हा उन्नत रस्ता प्रभादेवी पुलावरुन जाणार होता. मात्र सध्याच्या प्रभादेवी पुलाची दुरवस्था पाहता एमएमआरडीएने प्रभादेवी पूल पाडत त्या जागी नवीन पूल बांधण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी पूल पाडत त्या जागी द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा एक स्तर सध्याचा पुलाच्या जागेवर असणार असून दुसरा स्तर त्यावरुन जाणार आहे. पहिल्या स्तरावरून सध्या ज्या प्रमाणे स्थानिक वाहतूक सुरु आहे, तशी वाहतूक सुरु राहणार आहे. तर त्यावरील स्तरावरून अटल सेतूकडे येणारी-जाणारी वाहतूक सुरु राहणार आहे. तेव्हा सध्याचा पूल पाडत त्या जागी पूल बांधण्यासाठी एमएमआरडीएकडून मागील कित्येक महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून परवानगी मागितली जात होती. मात्र ही परवानगी मिळत नसल्याने पुलाच्या पाडकामास आणि नवीन पूल बांधण्यास पर्यायाने उन्नत रस्त्यास विलंब होत होता. पण आता मात्र वाहतूक पोलिसांनी पुलाच्या पाडकामासह नवीन पुल बांधण्यास परवानगी दिल्याची माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी लोकसत्ताला दिली.
८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेनचा पाडकामासाठी वापर
हा पूल १५ एप्रिल २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत पुलाचे पाडकाम करून नवीन द्विस्तरीय पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आव्हान एमएमआरडीएसमोर आहे. दरम्यान, पुलाच्या पाडकामासाठी एमएमआरडीएचे पथक सज्ज आहे. पुढील आठवड्यापासून पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर पुलाच्या पाडकामासाठी करण्यात येणार आहे. तर ५०० मेट्रीक टन वजनाची एक क्रेन प्रकल्पस्थळी राखीव असणार आहे. त्याचवेळी या कामादरम्यान दररोज आवश्यकतेनुसार रेल्वेकडून मेगाब्लाॅक घेतला जाणार आहे. नवीन द्विस्तरीय पूल तयार होऊन तो वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी जानेवारी २०२७ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील २० महिने मुंबईकरांना गैरसोयीला, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.