चकमक’फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घऱी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज (१७ जून २०२१ रोजी) छापा टाकला आहे, सकाळी सहा वाजता एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणानंतर समोर घडलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु आहे. प्रदीप शर्मांच्या घऱाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे. मात्र या एनआयएच्या छाप्यामुळे प्रदीप शर्मा पुन्हा चर्चेत आले असले तरी प्रदीप शर्मा चर्चेत आले असले तरी सचिन वाझेंप्रमाणेच प्रदीप शर्मांची राजकीय पक्षांशी असणारी जवळीक आणि वादग्रस्त कारकिर्द कायमच चर्चेत राहिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपामधून तिकीट मिळवण्यासाठी वाझेंनी प्रयत्न केले होते.
प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. या नकाराच्या माध्यमातून या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या आमदार होण्याच्या स्वप्नांना राजकीय पक्षांनी सुरुंग लावले. शर्मा यांनी एकाचवेळी शिवसेना आणि भाजप तर वाझे यांनी सेनेतून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु या दोन्ही राजकीय पक्षांनी त्यांना ठेंगा दाखविला.
नक्की वाचा >> “सचिन वाझेप्रमाणे प्रदीप शर्मांनाही अटक होणार; उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार”
लखनभय्याच्या खोटय़ा चकमकीप्रकरणी शर्मा यांना निर्दोष सोडण्यात आले होते. मात्र अन्य २२ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली. शर्मा यांच्या विरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर शर्मा यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळते का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी शर्मा इच्छुक होते. शिवसेनेकडून आपल्याला हिरवा कंदील मिळाल्याचे ते सांगत होते. परंतु त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र शाह यांनीही शर्मा यांना तिकीट देण्यात फारसा रस दाखवला नाही आणि अनेक दावे केल्यानंतरही प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली नाही. शर्मा यांनी अंधेरी पूर्वेतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा मिळविण्याचा ते प्रयत्न करीत होते.
नक्की वाचा >> अंबानी धमकी प्रकरण: NIA ने ज्यांच्या घरावर छापा टाकला ते प्रदीप शर्मा आहेत तरी कोण?
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नशीब आजमावले होते. मात्र बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी या निवडणुकीत विजय मिळवत प्रदीप शर्मांना धूळ चारली. प्रदीप शर्मा यांचा ३३ हजार १७७ मतांनी पराभव झाला होता.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतून उमेदवारी मिळेल, याबाबत वाझे आशावादी होते. परंतु त्यांनाही कुठूनही उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.