मंगल हनवते
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील संकेत क्रमांक ४१२ मधील विजेत्यांसाठी मंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे. मंडळाने या संकेत क्रमांकातील पंतप्रधान आवास योजनेतील ( अत्यल्प गट) घरांच्या ताबा प्रक्रियेस अखेर सुरुवात केली आहे. घराची १०० टक्के रक्कम भरलेल्या विजेत्यांना गाळा वितरण पत्र वितरित करण्यास मंडळाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अनेक विजेते दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
नव्या संगकीय प्रणालीनुसार पहिल्यांदाच सोडतीनंतरचीही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जात आहे. तर सोडतीपूर्वीच विजेत्यांची पात्रता निश्चित करण्यात आल्याने तात्पुरते देकार पत्र मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसात घराचा ताबा मिळेल असे वाटत होते. मात्र ताबा प्रक्रियेस काहीसा विलंब झाला. पण आता मात्र मंडळाने पीएमएवायमधील घरांची ताबा प्रक्रिया सुरु केली आहे. ४१२ संकेत क्रमांकातील ज्या विजेत्यांनी घराची १०० टक्के रक्कम भरली आहे, त्या विजेत्यांना गाळा वितरण पत्र १३ ऑक्टोबरपासून वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विजेत्यांना हा मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान आता गाळा वितरण पत्र मिळाल्यानंतर विजेत्यांना मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क भरून घराचा ताबा घेता येणार आहे. विजेत्यांना काही प्रक्रियेसाठी आता पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयात जावे लागणार आहे.