गेल्या वर्षी ५ मार्च रोजी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचा दावा देखील एनआयएकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकानं भरलेली एक चारचाकी गाडी आढळली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला घाबरवण्यासाठी हा मोठा कट आखण्यात आला होता. संबंधित स्फोटकानं भरलेली चारचाकी गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हिरेन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाची सर्व माहिती मनसुख हिरेनला होती. त्यांनी तोंड उघडलं तर आपल्या अडचणी वाढतील, अशी भीती सचिन वाझे आणि इतर आरोपींना होती.

त्यामुळे आरोपींनी संगनमत करून मनसुख हिरेन यांची हत्या केली. ५ मार्च २०२१ रोजी ठाण्यातील एका खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हेच या हत्येमागील मुख्य सूत्रधार होते, असा दावा एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना एनआयएनं म्हटलं की तो निर्दोष नाही. त्यानं गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्ये यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. न्यायमूर्ती ए. एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सनप यांच्या खंडपीठानं याचिकेवरील पुढील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.

एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, आरोपी प्रदीप शर्मा हा अंबानी कुटुंबासह लोकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य होता. तर मनसुख हिरेन हा या कटातील कमकुवत दुवा होता. हिरेनला या कटाची संपूर्ण माहिती होती. त्यानं तोंड उघडलं तर आपण अडचणीत येऊ, अशी भीती आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना होती. यातूनच त्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradip sharma is main conspirator in mansukh hiren murder case claims nia in court rmm