राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली. यानंतर आज (५ मे) या समितीने बैठक घेत शरद पवारांचा राजीनामा फेटाळला. तसेच पवारांनीच पक्षाचं अध्यक्ष रहावं असा एकमताने ठराव मंजूर केला. या बैठकीनंतर समितीतील नेत्यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. तसेच समितीचा निर्णय कळवला. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवारांनी घोषणा केलेल्या समितीची बैठक झाली. त्यात आम्ही आमच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते, नेत्यांची भावना व्यक्त करणारा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यानुसार शरद पवार यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदावर रहावं, अशी शिफारस करण्यात आली.”
“शरद पवार समितीच्या ठरावावर विचार करून निर्णय घेणार”
“बैठकीतील सर्व नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन हा ठराव शरद पवार यांना दिला आहे. त्यांनी आमच्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी ठरावावर विचार करण्यासाठी मला थोडा वेळ द्या, असंही त्यांनी सांगितलं. ते विचार करून त्यांचा निर्णय घेणार आहेत,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
हेही वाचा : अजित पवार येताच शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी; कार्यकर्ते म्हणाले, “आमचं म्हणणं आहे की…”
“शरद पवारांना विचार करण्यासाठी थोडा वेळ देणं आवश्यक”
“ते मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ देणं आवश्यक आहे. आम्हाला शरद पवार यांच्याकडून त्यांचा निर्णय कळाला की, याबाबतची माहिती आम्ही नक्की देऊ,” असंही पटेल यांनी नमूद केलं.
दरम्यान, बैठकीनंतर समितीने पत्रकार परिषद घेत निर्णयाची माहिती दिली. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शरद पवार आपला निर्णय कार्यक्रमात जाहीर करतील याची अजिबात कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वांनी आपली भावना व्यक्त केली. त्यानंतरही पक्षाचे ज्येष्ठ मान्यवारांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांना तेव्हापासून विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे, अशी विनंती शरद पवारांना केली.”
“शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर”
“शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला. यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
हेही वाचा : Maharashtra Breaking News Live : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा पक्षकार्यालबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
“आम्ही शरद पवारांची भेट घेऊ”
“आम्ही शरद पवारांची भेट घेऊ आणि समितीने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांना कळवू. त्यांनी किती काळ अध्यक्ष रहावं याबाबत आम्ही काहीही कालमर्यादा दिलेली नाही. आम्ही काही दिवसांपूर्वीच एकमताने त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती,” असंही प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केलं.