राज्य पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्तयांवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात झालेल्या मतभेदामुळे जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी बदल्यांना मुहुर्त मिळालेला नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने या कोडींवर मार्ग काढण्याकरिता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी मध्यस्थी केली व उभयतांमध्ये सहमती घडवून आणली. परिणामी येत्या दोन दिवसांत बदल्यांचे आदेश निघतील, असे सांगण्यात आले.
मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच सहआयुक्त (गुन्हे) या दोन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तयांवरून सरकारमध्ये मतभेद झाले आहेत. याबरोबरच आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तयांबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शिफारस केलेली नावे मुख्यमंत्र्यांना मान्य नव्हती. भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस.) अधिकाऱ्यांच्या बदल्या या साधारणपणे मे महिन्यात केल्या जातात. गृहमंत्रालयाने बदल्या आणि नियुक्तयांची यादी तयार करून ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केली होती. पण काही नावांना मुख्यमंत्र्यांनी काट मारल्याने पोलिसांच्या बदल्या रखडल्या होत्या.
पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तयांमध्ये आपल्याला मुक्तवाव दिला जात नाही, अशी तक्रार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गेल्या मंगळवारी नवी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये शक्यतो स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या शिफारसींनुसार नियुक्तया कराव्यात, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात निर्माण झालेली कोंडी फोडण्याची जबाबदारी शरद पवार यांनी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार शनिवारी प्रफुल्ल पटेल आणि आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी जवळतास दीड तास चर्चा केली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या वतीने काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी देण्यात आल्याचे समजते.
प्रफुल्ल पटेल आणि आर. आर. पाटील यांनी आपली भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांचे म्हणणे होते. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे असलेल्या काही खात्यांबाबत मार्ग काढण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Story img Loader