मुंबई : उद्याोजक रवी पंडित, अभिनेता अतुल कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी, मिलिंद म्हैसकर, आयपीएस अधिकारी सदानंद दाते, विख्यात शास्राीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, अर्थवेत्त्या विद्या महांबरे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, आंतरराष्ट्रीय गणितज्ज्ञ दिनेश ठाकूर… आदी मान्यवरांत एक समान धागा कोणता?
ते मराठी आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे प्राथमिक—काहींचे माध्यमिकही शिक्षण मराठी माध्यमांतच झाले आहे. मराठीत शिकून आपल्या कर्तृत्वाची पताका ज्यांनी सर्वदूर फडकवली असे अनेक आजही आहेत. कर्तृत्वाची शिखरे सर करताना या आणि अशा अनेकांना आपल्या मराठी भाषेतील शिक्षणाचा अडथळा तर आला नाहीच; उलट मातृभाषेतून शिक्षण झाल्याने त्यांचा पाया पक्का झाला.
या पायावर ज्यांनी विविध क्षेत्रात यशोमंदिरे उभी केली अशा या पिढीच्या निवडक मान्यवरांची गाथा ‘लोकसत्ता’ एका विशेष प्रकाशनाद्वारे लवकरच सादर करेल. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक वाचाळ घोषणा आणि तोंडाळ चर्चा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ म्हणत सादर होतील. या भाऊगर्दीत आणखी एका कार्यक्रमाची भर घालण्यापेक्षा मराठीत शिकून ‘मोठे’ झालेल्यांच्या खऱ्या कथा त्यांच्याच शब्दात सादर करणे अधिक उपयोगी आणि परिणामकारक असेल हा विचार ‘लोकसत्ता’च्या या प्रकाशनामागे आहे. यातील नायक-नायिका वयोवृद्ध नाहीत. हे सर्व अजूनही आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि म्हणून त्यांच्या कथा आजच्या पिढीस अधिक प्रेरणादायी ठरतील. कोणत्या भाषा माध्यमात शिक्षण होते यापेक्षा काय आणि कसे शिकायचे हे महत्त्वाचे असते हे लक्षात येऊन काही जणांना तरी आपापल्या मुलाबाळांस मराठी माध्यमाच्या शाळांत घालावे असे वाटले तर या प्रकाशनाचा आणि त्यापेक्षाही अधिक मराठी भाषा गौरव दिनाचा हेतू साध्य होईल.
पुण्यात लवकरच खास सोहळ्यात प्रसिद्ध होणाऱ्या या विशेष प्रकाशनाचे अन्य मानकरी
सनदी अधिकारी अश्विनी भिडे, अभिजित बांगर, हृषीकेश मोडक, उद्याोजक अजित गाडगीळ, झेलम चौबळ, दीपक घैसास, अमित वाईकर, अशोक जैन, वैद्याकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. निखिल दातार, डॉ. नितीन वैरागकर, डॉ. आलाप जावडेकर, आयसीटीचे माजी कुलगुरू गणपती यादव, अमेरिकेतील लष्करी अधिकारी मधुरा पालांडे, भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय चौथाईवाले, सिने-नाट्य क्षेत्रातील कलाकार अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर</p>