वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर काही ऐतिहासिक कागदपत्रे सादर करत ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचा दावा केला. यावर काही इतिहासकारांचा आक्षेप असल्याबाबत प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधी कोणी जय भवानी ही घोषणा दिली असेल तर त्याची माहिती समोर येऊ द्या. शिवाजी महाराजांचा दडलेला इतिहास बाहेर येऊ द्या. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. स्वातंत्र्याच्या कालावधीत शिवाजी महाराजांना पुन्हा सार्वजनिक जीवनात आणण्याचा एक लढा झाला. त्याविषयीची जेवढी अधिक माहिती येईल तेवढी चांगली. मी असं म्हणेन की आम्ही याची सुरुवात केलीय.”
“जय भवानी घोषणा १९२४ च्या आधी वापरल्याची माहिती असेल तर समोर आणावी”
“जय भवानी घोषणा १९२४ च्या आधी वापरल्याची माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांनी ती समोर आणावी. उलट त्यामुळे संशोधन होईल. जय भवानी ही घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यावरच त्यांनी महाडचा सत्याग्रह केला. लेटरहेडवरही भवानीचं चित्र होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाणच तसं होतं,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
“डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि महात्मा गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार केला होता,” असंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.
“मुंबई प्रभाग रचनेला आमचा विरोध”
प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील नव्या प्रभाग रचनेला विरोध केलाय. याविरोधात आंबेडकरांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले, “पालिका प्रभाग निश्चिती संदर्भात २४ फेब्रुवारीला अॅडव्होकेट जनरल आपली बाजू मांडतील. या प्रकरणात घटना आणि कायदा हा राजकीय फायद्यापेक्षा महत्वाचा आहे हाच मुद्दा आम्ही मांडलाय. आम्ही प्रभाग पद्धतीच्या विरोधात आहोत.”
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे.”
हेही वाचा : ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली : प्रकाश आंबेडकर
“डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्या वेळी शिवाजी महाराज, महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने “शिवाजी महाराज”, “राजमाता जिजाऊ” यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती. ठेकेदारांनो जरा वाचायला शिका,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.