भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आता समविचारी राजकीय पक्ष व संघटनांच्या ऐक्यासाठी पुढे सरसावले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने एक भक्कम राजकीय पर्याय उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्याचसाठी त्यांनी सोमवारी एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला डावे पक्ष, तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनांना आमंत्रित करण्यात आले आहे.
आंबेडकरी चळवळ किंवा रिपब्लिकन राजकारणाला सध्या कमालीची मरगळ आली आहे. रामदास आठवले यांची शिवसेना-भाजपबरोबर युती करण्याची भूमिका दलित समाजाला फारशी रुचलेली नाही. महागाई, गॅसदरवाढ, जल, जंगल, जमीन या प्रश्नांवर एकाकी लढणाऱ्या संघटनांची सरकारी दरबारी फारशी दखल घेतली जात नाही. सरकारची धोरणे व्यापारी व उद्योगपतींना झुकते माप देणारी आहेत. धार्मिक तेढ वाढविण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर केला जात आहे. राजकीय फायद्यासाठी जातीय भावना भडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. सर्वसामान्याच्या प्रश्नांवर एकाकी लढणाऱ्या पक्ष- संघटनांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका भारिप- बहुजन महासंघाने घेतली असून राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष व संघटनांना एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार सकाळी ११ वाजता दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे पक्षप्रवक्त्या डॉ. उज्वला जाधव यांनी सांगितले. अर्थात रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटांना बैठकीला बोलाविण्यात आलेले नाही व हे रिपब्लिकन ऐक्य नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा