वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. मविआ फुटायला सुरुवात झाली आहे, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस मविआबरोबर लढणार नसून स्वतंत्र लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते बुधवारी (१७ मे) मुंबईत टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या पक्षातील असलो, तर माझे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. त्यामुळे मला कुणाकडेही जायला वेळ लागत नाही.”
“त्यामुळे मविआ फुटायची सुरुवात झाली”
“काँग्रेसने आधीच जाहीर केलंय की, मुंबई महानगरपालिकेत ते महाविकासआघाडीत नसून स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे मविआ फुटायची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक जास्त घटना घडणार आहेत. तिथं काय होतं हे पाहून आणखी काही पक्ष भूमिका घेतील,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : VIDEO: नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या…”
“ठाकरे गटाने जागा सोडल्यास दक्षिण मध्यमधून लढणार का?”
“ठाकरे गटाने जागा सोडल्यास दक्षिण मध्यमधून लढणार का?” या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कोणती जागा कुणी लढवायची हा आमच्यात प्रश्नच येत नाही. कारण आम्हाला अद्याप आमच्या युतीबद्दल स्पष्टता आलेली नाही.”