मुंबईत ‘इंडिया’ या देशभरातील विरोधी पक्षांच्या आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीला बोलावलंच गेलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचं दिसत असलं, तरी काही पक्षांना या बैठकीचं निमंत्रणच दिलेलं नसल्याचं समोर येत आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीला बैठीकचं निमंत्रण नसल्याचं सांगत आता काँग्रेसलाच याबाबत विचारा असं म्हटलं. बुधवारी (३० ऑगस्ट) भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी आयोगाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही शिवसेनेबरोबर अजूनही आहोत. आता आम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण का दिलं नाही याबाबत माध्यमांनी काँग्रेसला प्रश्न विचारणं अधिक योग्य होईल. २०१९ मध्येही आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. याहीवेळी आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. परंतु काँग्रेसच आम्हाला आघाडीबाबत निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीत नाही.”
“देवेंद्र फडणवीस १ जानेवारीला भीमा कोरेगावपासून ४० किलोमीटरवर होते”
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी आयोगाच्या सुनावणीवरही प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस १ जानेवारीला भीमा कोरेगावपासून ४० किलोमीटरवर नगर जिल्ह्यात होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने ११.३० ते ११.४० वाजता टेक ऑफ केल्याची नोंद आहे. दंगल सकाळी झाली. त्यांना या दंगलीविषयी माहिती असतं तर त्यांनी पुण्याला येऊन दंगलीचा आढावा घेतला असता. मात्र, त्यांना दंगलीची माहिती मिळालीच नाही. त्यामुळे हे प्रशासकीय स्तरावरचं अपयश आहे की राजकीय अपयश आहे याची आयोगाने चौकशी करावी.”
“अनेकांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची माहिती दाबून ठेवली”
“अनेकांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची माहिती दाबून ठेवली आहे. त्याबाबत मी आयोगाला पुढील सुनावणीत दोन घटना सांगणार आहे. मुंबई सारख्या बॉम्बस्फोटातही सगळी माहिती मिळालेली असताना ती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहचली नाही नाही म्हणून ते त्याविरोधात कारवाई करू शकले नाहीत आणि २६/११ ची घटना घडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “आपण चंद्रावर पोहोचलो, पण रोजच्या…”; भाजपा-आरएसएसचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल, म्हणाले…
“सुनावणीत माझ्या जबाबानंतर प्रश्नही विचारण्यात आले”
“पुन्हा पुन्हा अशा घटना होत आहेत. त्यामुळे यात जबाबदारी निश्चित करण्याचं काम आयोगाने करावं. सुनावणीत माझ्या जबाबानंतर प्रश्नही विचारण्यात आले. मी त्या प्रश्नांची उत्तरं आयोगाला दिलेली आहेत. संभाजी महाराजांचं दफन कुणी केलं या वादातून उलटतपासणी झाली. आता नवं राजकीय समीकरण तयार होत आहे. सरंजामशाही मराठ्यांची आणि ब्राह्मणशाहीची नव्याने युती होत आहे,” असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.