जातीय अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोन वेगवेगळे मोर्चे निघाले. भारिपच्या मोर्चात विविध रिपब्लिकन गट, डाव्या पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बसपनेही मोर्चाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन राजकारणाच्या ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे. रिपाइच्या शक्तीप्रदर्शनामुळे भाजपच्या सत्तेतील काहीसा वाटा मिळण्याची अशी आठवले गटात आशा निर्माण झाली आहे.  
राज्यात जवखेडा दलित हत्याकांड व अन्य अत्याचाराच्या घटनांमुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राग असलेलेले रिपब्लिकन गट, संघटना आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चात एकत्र आले होते. त्यात रिपब्लिकन गवई गट, राष्ट्रीय दलित पॅंथर, डेमाक्रॅटिक रिपब्लिकन (कांबळे गट) इत्यादींचा थेट समावेश होता. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व बसपचे नेते सुरेश माने यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला होता. त्याशिवाय डाव्या-पक्षसंघटनांचाही लक्षणीय सहभाग होता. जातीअंताची चळवळ चिकाटीने करावी लागेल, परंतु रस्त्यावरच्या लढाईबरोबरच मतपेटीतील लढाईही पुढच्या काळात ताकदीने लढावी लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची मांडणी म्हणजे गटातटात विभागलेल्या रिपब्लिकन राजकारणाच्या ध्रुवीकरणाची ही सुरुवात असल्याचे मानले जाते. जवखेडे हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा आणि ५ डिसेंबरच्या आत इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन करावे, या मागण्यांसाठी आठवलेंनीही जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आठवले यांच्या शक्तीप्रदर्शनामुळेच मंत्री विनोद तावडे यांना मोर्चाला सामोरे जावे लागले. जवखेडेा हत्याकांडाची सीबीआय चौकशी व १४ एप्रिलला आंबेडकर स्मारकाचे भूमीपूजन करण्याच्या आश्वासनामुळे मोर्चातील मुख्य मागण्या तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाली.

Story img Loader