मुंबई : कोणत्याही शक्तीविरोधात एकवटून लढले पाहिजे. आपली भूमिका आक्रमक आणि आग्रहाने मांडली पाहिजे. यासाठी कुटुंब आणि चळवळ यापैकी एकाची निवड करावी लागते. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत. त्यामुळे आपण कितीही डोके आपटले तरी त्यांची एकी होणे कठीण आहे, अशी खंत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केली.
साने गुरुजींची १२५ वी जयंती आणि राष्ट्र सेवा दलाच्या शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित ‘संविधान निर्धार सभेचे’ आयोजन वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात आयोजित केले होते. या वेळी आंबेडकर बोलत होते. जेव्हा संधी येईल तेव्हा संविधान बदलू, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका राहिली आहे. यानुसार ते वागत आहेत. हा वैचारिक संघर्ष आपण जनतेपर्यंत नेण्यास कमी पडलो आहे. त्यामुळे संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधात असे गट पडले असताना आपणास ठोस भूमिका घेतली पाहिजे. भाजपला दोन-तृतीयांश बहुमत मिळाल्यास घटनेत बदल करतील. त्यामुळेच भाजप या बहुमतापर्यंत पोहचणार नाहीत याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असा सावधानतेचा इशारा आंबेडकर यांनी दिला.