लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोमवारी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित, मुस्लिम व ओबीसींचा खास अजेंडा घेऊन २३ लहान-मोठय़ा पक्ष-संघटनांचा समावेश असलेल्या ‘महाराष्ट्र लोकशाही आघाडी’च्या स्थापनेची घोषणा केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपला आघाडीचा विरोध राहील, तर आरपीआय किंवा बसपला आघाडीत स्थान मिळणार नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसबरोबरच्या चर्चेचा गाडा मध्येच अडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पर्यायी राजकीय आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार डावे पक्ष व संघटनांच्या अनेकदा बैठका घेऊन त्यांनी अखेर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडी नावाने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे जाहीर केले. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांची आर्थिक धोरणे सारखीच आहेत, शिवाय भ्रष्टाचारालाही दोन्ही पक्ष तेवढेच जबाबदार आहेत, त्यामुळे या पक्षांशी युती करायची नाही, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेच्या विरोधातील इतर पक्षांना बरोबर घेणार का, असे विचारले असता राजकारणात काहीही स्थान नसलेले आरपीआयचे गट आणि बसपला वगळून इतर पक्षांचे आघाडीत स्वागत असेल, असे त्यांनी सांगितले. जनता दल, आम आदमी पार्टी, शेतकरी संघटना यांच्याही आपण संपर्कात आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक अजेंडय़ासह जाहीर केलेल्या पर्यायी आघाडीत भारिप-बहुजन महासंघ, सीपीआय, सीपीआय (एम.एल.), सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी, ओबीसी-एनटी पार्टी, समाजवादी पक्ष, सत्यशोधक जनआंदोलन, लाल निशाण पक्षाचे दोन गट, लोकसंघर्ष मोर्चा, सर्वहारा जनआंदोलन, पॅंथर रिपब्लिकन, समाजवादी जन परिषद, जमात ए इस्लाम हिंदू महाराष्ट्र, इत्यादी संघटनांचा समावेश आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचीही धावपळ
दलित मतदारांना खेचून घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही धावपळ सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या मंगळवारी घाटकोपरमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत दलित कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिण्यात आला आहे. काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली या महिनाअखेरीस दलित, मागासवर्गीय व अल्पसंख्याकांचा भव्य मेळावा आयोजिण्याचा निर्णय घेतला आहे. मेळाव्याची तारीख ३१ मे अशी ठरविली गेली असून राहुल गांधी यांच्या सोयीनुसार त्यात बदल केला जाईल, असे समजते.
आंबेडकरांची दलित, मुस्लिम, ओबीसी आघाडी स्थापन
लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोमवारी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित, मुस्लिम व ओबीसींचा खास अजेंडा घेऊन २३ लहान-मोठय़ा पक्ष-संघटनांचा समावेश असलेल्या ‘महाराष्ट्र लोकशाही आघाडी’च्या स्थापनेची घोषणा केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपला आघाडीचा विरोध राहील, तर आरपीआय किंवा बसपला आघाडीत स्थान मिळणार नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
First published on: 21-05-2013 at 01:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar establish dalit muslim obc forefront