रामदास आठवले आंबेडकरी चळवळीशी कधीही प्रामाणिक राहिले नाहीत. राजकीय स्वार्थासाठीच ते अधून-मधून रिपब्लिकन ऐक्याचे पिल्लू सोडून देतात. आताही शिवसेनेकडून खासदारकी मिळविण्यासाठीच त्यांनी पुन्हा ऐक्याचा राग आळवायला सुरुवात केल्याची खरमरीत टीका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
आंबेडकरी चळवळीत आठवले यांना आता काहीही किंमत राहिलेली नाही. त्यांना राजकीय स्वार्थ सधायचा असतो किंवा त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले की ते रिपब्लिकन ऐक्याच्या नावाने दबावतंत्र सुरू करतात, असा आरोप आंबेडकर यांनी केला.  
‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा व पक्षाचे अध्यक्षपद त्यांनी घ्यावे आपण कोणतेही दुय्यम पद स्वीकारण्यास तयार आहोत, असे विधान केले होते. त्यावर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीत काही मिळेनासे झाले, त्यावेळी त्यांनी  शिवेसना-भाजपचा रस्ता धरला. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा खासदारकी मिळविण्यासाठी त्यांनी या पक्षांशी युती केली. आता शिवसेनेकडून खासदारकी मिळणार नसल्याची कुणकुण लागल्यामुळे ते ऐक्याची भाषा करू लागले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

Story img Loader